Ishwarpur: इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर; शासन निर्णय जारी, नामकरणाची घोषणा होताच शहरात मोठा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:34 IST2025-11-04T19:14:39+5:302025-11-04T19:34:20+5:30
Islampur Renamed as Ishwarpur:

Ishwarpur: इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर; शासन निर्णय जारी, नामकरणाची घोषणा होताच शहरात मोठा जल्लोष
ईश्वरपूर : राज्य शासनाने इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याच्या पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने सोमवारी मान्यता दिली. त्यानुसार राज्य शासनाने शासन निर्णय जारी करत इस्लामपूर नगर परिषदेचे नाव बदलून ते उरूण-ईश्वरपूर असे करण्याचे जाहीर केल्यानंतर शहरामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे करण्याची मागणी विविध सामाजिक आणि हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय पक्षांकडून केली जात होती. त्यानुसार पालिकेत सत्तेवर असलेल्या तत्कालीन विकास आघाडीने ईश्वरपूर असे नामकरण करण्याचा ठराव करत तो शासनाकडे पाठवला होता. त्यावर विधीमंडळात या प्रस्तावाला मान्यता देत महायुती शासनाने हा प्रस्ताव अधिकृत मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवला होता.
शहरामध्ये उरूण ईश्वरपूर असे नामकरण झाल्यावर रॅली काढत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतिश महाडिक, अमित ओसवाल, सुजित थोरात, सत्यवाण रासकर, अमोल ठाणेकर, गजानन फल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र शासनाने ईश्वरपूरच्या नावाला मान्यता दिल्यानंतर राज्य शासनाने उरूण -इस्लामपूर शहराचे नाव उरूण ईश्वरपूर असे करत समस्त शहरवासियांच्या गेल्या अनेक दशकापासूनच्या मागणीला न्याय दिला आहे.या नामांतरासाठी समाजातील अनेक घटकांनी पाठपुरावा केला.त्यांचे अभिनंदन करतो. - निशिकांत भोसले-पाटील, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस
इस्लामपूर शहराचे नाव उरूण ईश्वरपूर असे अधिकृतरित्या शासनाकडून घोषित करण्यात आले आहे. मात्र विरोधकांनी ईश्वरपूरबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी असा संभ्रम निर्माण करू नका असे त्यांना ठणकावून सांगितले होते. कायदेशीर बाबीने आज उरूण ईश्वरपूर झाल्याने विरोधक तोंडावर पडले आहेत. - सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले. या नामांतराच्या लढ्यात शिवसेना नेहमी अग्रेसर राहिली.सर्व शिवसैनिक आणि उरूण ईश्वरपूर शहरवासियांचे अभिनंदन. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना