Sangli: मिरजेत आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणारा बुकीस अटकेत, पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 01:35 PM2024-04-06T13:35:11+5:302024-04-06T13:35:42+5:30

मिरजेत प्रत्येक बुकींच्या स्वतंत्र ॲपवरून बेटिंग सुरू

IPL cricket betting bookies arrested in Miraj sangli | Sangli: मिरजेत आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणारा बुकीस अटकेत, पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ

Sangli: मिरजेत आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणारा बुकीस अटकेत, पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ

मिरज : मिरजेत रमजान जब्बार सतारमेकर (वय ३५, रा. शनिवार पेठ, सतारमेकर गल्ली, मिरज) या बेटिंग बुकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाइल असा ३३ हजारांचा ऐवज जप्त केला. आयपीएल क्रिकेटवर मिरजेत जोरदार बेटिंग सुरू असून पोलिसांच्या या कारवाईमुळे बुकींमध्ये खळबळ उडाली होती.

स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार व हवालदार संजय कांबळे यांना गुरुवारी रात्री मिरजेत शनिवार पेठेत नागोबा कट्ट्याजवळ संगीत महल या दुकानाच्या बाजूस रमजान सतारमेकर हा बुकी मोबाइलवर आयपीएल क्रिकेटच्या गुजरात टायटन्स विरुध्द पंजाब किंग्ज या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तेथे जाऊन रमजान सतारमेकर यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या मोबाइलमध्ये क्रिकेट बेटिंगचे क्रिकेट लाइन गुरू ॲप्लिकेशन चालू स्थितीत व खिशात १८ हजार रोख रक्कम सापडली. 

त्यास मोबाइल ॲप्लिकेशन व रोख रकमेबाबत विचारणा केली असता, क्रिकेट लाइन गुरू या ॲप्लिकेशनवर आयपीएल क्रिकेटच्या गुजरात टायटन्स विरुध्द पंजाब किंग्ज सामन्यात पहिल्या ५ ओव्हरपर्यंत होणाऱ्या धावा व सामन्यात विजेत्या व पराभूत संघावर ग्राहकांकडून पैसे घेऊन ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या रेटवर सट्टा घेत असल्याची कबुली दिली. आरोपी रमजान याच्यासह रोख रक्कम व मोबाइल मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देऊन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजेत आयपीएल क्रिकेट बेटिंगवर दररोज लाखोंची उलाढाल सुरू असून आयपीएल क्रिकेट बेटिंग बुकींसाठी पर्वणीच ठरले आहे. 

मिरजेत प्रत्येक बुकींच्या स्वतंत्र ॲपवरून बेटिंग सुरू आहे. ॲपवर बेटिंग खेळण्यासाठी एजंटाकडे रोख पैसे भरून ग्राहकाला आयडी पासवर्ड देण्यात येतो. या आयडीवरून प्रत्येक सामन्यावर बेटिंग सुरू आहे. ॲपशिवाय हॉटलाइनवरून थेट बुकींकडे बेटिंग लावण्यात येते. यातून प्रत्येक सामन्यावर लाखोंची उलाढाल होते. जिल्ह्यासह लगतच्या बेळगांव जिल्ह्यातील क्रिकेट बेटिंगचेही नियंत्रण मिरजेतून होते. गतवर्षी कर्नाटक पोलिसांनी मिरजेत छापा टाकून मिरजेतील बुकींवर कारवाई केली होती. मिरजेत आठ ते दहा बेटिंग असून त्यापैकी एकावर कारवाई होताच अन्य बुकी भूमिगत झाले आहेत.

Web Title: IPL cricket betting bookies arrested in Miraj sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.