सांगली : जिल्ह्यातील मातब्बर नेते मंत्रिमंडळात असताना त्यांनी कोणताही मोठा प्रकल्प जिल्ह्यात आणला नाही. कृष्णाकाठच्या वसंतदादासह इतर नेत्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यावर अन्याय केला. इथल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही काही केले नाही; कारण या नेत्यांमध्ये काम करण्याची वृत्तीच नव्हती, अशी जोरदार टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केली.सांगली शहर धनगर समाजाच्या वतीने रविवारी स्टेशन चौकात आमदार गोपीचंद पडळकर, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सत्कार समितीचे निमंत्रक तात्यासाहेब गडदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी महापौर संगीता खोत, नितीन सावगावे, ब्रह्मानंद पडळकर, पृथ्वीराज पवार, आकाराम मासाळ, डॉ. रवींद्र आरळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पडळकर म्हणाले, खोट्या केसेसमध्ये मला अडकवून येथील कारागृहात टाकले होते. आज येथील स्टेशन चौकात माझा सन्मान होतो, ही अभिमानाची बाब आहे. राजसत्ता आणि राजपाट हा हिसकावूनच घ्यावा लागतो. एका ध्येयातून वाटचाल केल्यामुळे आज निवडून आलाे. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक विषय मांडले. हा जिल्हा दोन पुढाऱ्यांचा आहे, असे म्हटले जाते; परंतु त्यांच्या विचाराचा काही फायदा झाला नाही. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, विकासात्मक परिवर्तनाची गरज आहे.
जिल्हा बँक ही आर्थिक वाहिनी आहे. येथील भ्रष्टाचाराची चौकशी होऊनही कारवाई होत नाही. सभासदांच्या मालकीचे महांकाली, माणगंगा कारखाने विकून खिशात घालण्याचा डाव सुरू आहे. हे कारखाने सभासदांच्या मालकीचे राहिले पाहिजेत.ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील मातब्बर नेते मंत्रिमंडळात असताना दहा हजार बेरोजगारांना काम देणारा प्रकल्प आणता आला नाही. कृष्णाकाठच्या नेत्यांनी दुष्काळी भागावर नेहमी अन्याय केला; परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रकल्प देऊ, अशी ग्वाही दिली आहे. सांगलीत सेव्हनस्टार लायब्ररी उभारण्यासाठी पाठपुरावा करू. भटक्या विमुक्त जमातीसाठी विशेष निधी मंजूर केला पाहिजे, अशी मागणी केली जाईल. सांगलीत महाराजा यशवंतराव होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, समाजाकडून खूप अपेक्षा आहेत, परंतु समाज तसा शहाणा नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी असा उल्लेख सर्वांनी केला पाहिजे. त्यांचे नाव आजही अनेकजण चुकीचे घेतात. देशातील त्या पाचव्या पुण्यश्लोक आहेत. याचा अभिमान ठेवावा. जो समाज श्रद्धा विसरतो, त्या समाजाची उन्नती होत नाही.आमदार देशमुख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सांगलीत वास्तव्यास असलेल्या सांगोल्यातील नागरिकांनी मोठी मदत केली. आमदार गाडगीळ यांनी सांगलीच्या विकासासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
मंत्रिपदाची अपेक्षाआमदार देशमुख म्हणाले, जे सांगलीकरांचे दु:ख आहे, तेच सोलापूर जिल्ह्याचे आहे. दोन्ही जिल्ह्यांतील जनतेला जिल्ह्यात मंत्रिपद न मिळाल्याची खंत, व्यथा आहे. दोन्ही जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आबांच्या मुलगा आमदार झाल्याचे त्यांना दु:खआमदार पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना जोरदार टीका केली. अकरा हजार मते मिळाल्यामुळे ते पडल्यासारखेच आहेत. आर. आर. आबांचा मुलगा आमदार होतो, माझा का नाही, याचे त्यांना टेन्शन आहे. त्यांनी मुलासाठी जतचा अभ्यास केला. तेथे नापास ठरले. हातकणंगले, सांगली लोकसभेसाठी चाचपणी केली; परंतु अपयश येणार हे माहीत झाले. सत्ता, पैसा यावर राजकारण करता येत नाही.