ऊसतोड मजुरांची कमाल! ऊसाची ट्रॉली ओढण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरऐवजी मानवी शक्तीचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 15:35 IST2025-03-02T15:34:40+5:302025-03-02T15:35:46+5:30
कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

ऊसतोड मजुरांची कमाल! ऊसाची ट्रॉली ओढण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरऐवजी मानवी शक्तीचा वापर
कडेगाव, प्रताप महाडीक: ऊसतोड मजुरांनी एकजुटीचे बळ दाखवत तब्बल दहा टन ऊसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर व १७ माणसांच्या ताकदीने ओढून काढल्याची अजब घटना वाजेगाव चिंचणी येथे घडली. उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड, पारे बामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग पाहायला मिळाला. गुरुवारी (२७ फेब्रु) कारखाना बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळपासाठी पोहोचवण्याची घाई होती. वाजेगाव चिंचणी (ता. कडेगाव) येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती. मात्र, १० टन ऊसाने भरलेली ट्रॉली शेतात रुतल्याने मोठा पेच निर्माण झाला.
गुरुवारी दुपारी १२ पर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहनतळावर पोहोचणे अनिवार्य होते. पहाटेच्या वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार होता. मात्र, दुसरा ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने १७ ऊसतोड मजुरांनी सोल (मोठी रस्सी) बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला.कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम व कारखाना प्रशासनानेही या प्रयत्नांचे कौतुक केले. एकीच्या बळावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते, हे ऊसतोड मजुरांनी सिद्ध केले आहे.
एकीचे बळ अन् मजुरांची जिद्द!
कारखान्याचे कर्मचारी सचिन कोळी, ऊसतोड मजूर व शेतकऱ्यांनी एकसंघ होत सोल बांधून ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न केला. दिघंची येथील ट्रॅक्टर मालक आणि चालक अमोल श्रीमंत पुजारी यांनीही या प्रयत्नात सहभाग घेतला. ट्रॅक्टरची शक्ती आणि मजुरांची मेहनत यामुळे ऊसाने भरलेली ट्रॉली बाहेर काढण्यात अखेर यश आले. ही घटना ऊसतोड मजुरांच्या जिद्द, मेहनत आणि संघटनशक्तीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली.