Sangli: आटपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेसेना आमने-सामने, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:37 IST2025-11-05T19:36:52+5:302025-11-05T19:37:28+5:30
Local Body Election: पहिलीच थेट निवडणूक चुरशीची, समीकरणे बदलणार

Sangli: आटपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेसेना आमने-सामने, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरणार ?
लक्ष्मण सरगर
आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचेच घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने शहरातील राजकारण तापले आहे. भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील सरळ लढत ही केवळ नगराध्यक्ष पदापुरती मर्यादित न राहता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे.
आटपाडी नगरपंचायत स्थापन होऊन तीन वर्षे होत असली तरी आता पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक ‘प्रतिष्ठेची’ बनली आहे. ग्रामपंचायत काळात शिंदे सेनेचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या गटाने सरपंचपद मिळवत सत्ता राखली होती. मात्र, सरपंच एका गटाचा आणि सदस्य दुसऱ्या गटाचे असल्याने विकासकामांवरून सातत्याने राजकीय संघर्ष होत होता. आता ही लढाई थेट महायुतीच्या अंगणात पोहोचली आहे.
आटपाडी शहरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिंदे सेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, स्वाभिमानी गटाचे नेते भारत पाटील, आनंदराव पाटील आणि आरपीआयचे राजेंद्र खरात आदी नेत्यांची समीकरणे आता बदललेली दिसत असून, यामुळे निवडणुकीत अनपेक्षित गठबंधन होण्याची शक्यता आहे.
भाजपचा पडळकर व देशमुख गट हातमिळवणीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर शिंदे सेनेचे तानाजी पाटील स्वतंत्रपणे मैदानात उतरतील अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट) सध्या निरीक्षकाच्या भूमिकेत असून, भाजपा व शिंदेसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढून तिसरा पर्याय निर्माण करणार का? हे लवकरच समजेल.
समीकरणे बदलणार
आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चुरशीची ठरणार असून, पारंपरिक विरोधकांमध्येच ही निवडणूक पार पडणार का? का अन्य समीकरणे पहायला मिळणार? महायुतीतीलच दोन गट आमनेसामने आल्याने ही लढत तालुक्यापलीकडे जाऊन जिल्हास्तरावर चर्चेचा विषय बनली आहे. कोणाचा गट नगरपंचायतीवर झेंडा फडकवणार आणि राष्ट्रवादीची चाल कोणाला फायद्याची ठरणार? हे पाहणे आता राजकीय वर्तुळासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.