Sangli-Local Body Election: शिराळ्यात ‘काका-पुतण्या’ यांच्यातील संघर्ष, भानामतीच्या चर्चेने गाजली निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:39 IST2025-12-04T18:37:17+5:302025-12-04T18:39:21+5:30
दुरंगी लढतीने चुरस, निकाल लांबल्याने उमेदवार तणावाखाली

Sangli-Local Body Election: शिराळ्यात ‘काका-पुतण्या’ यांच्यातील संघर्ष, भानामतीच्या चर्चेने गाजली निवडणूक
विकास शहा
शिराळा : शिराळा नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकूण ५७ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, अर्ज माघारीच्या नाट्यमय घडामोडीनंतर अनेक जणांची तलवार म्यान झाली आणि मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप-शिंदेसेना अशी दुरंगी झाली. विशेष म्हणजे, या निवडणुकीतून काँग्रेस आणि उद्धवसेना ‘गायब’ झाल्याचे चित्र होते.
‘काका-पुतण्या’ संघर्ष : नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे अभिजीत नाईक आणि भाजप-शिंदेसेनेचे पृथ्वीसिंग नाईक यांच्यात थेट लढत झाली. याशिवाय, सहा अपक्ष उमेदवारही मैदानात होते. ज्यामुळे मतांच्या विभाजनाची चर्चा जोरदार सुरू आहे. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक यांची राष्ट्रवादीसाठी तर खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, ॲड. भगतसिंग नाईक, सम्राट महाडिक यांनी मोर्चेबांधणी केली होती. नागपंचमीला जिवंत नागाच्या पूजेसाठी कोणाला किती परवानगी मिळाली, हा मुद्दा प्रचारात गाजला.
भाजपने २० नागांना शैक्षणिक उपयोगासाठी परवानगीचा मुद्दा उचलला, तर राष्ट्रवादीने ६४ मंडळांना प्रत्येकी ५ नाग पकडण्याची परवानगी आणल्याचा दावा केला. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा निधी कोणी अडवला? शहरातील विकास कोणी केला आणि कोणी रोखला? या मुद्द्यांभोवती राजकारण केंद्रित झाले होते.
निवडणुकीदरम्यान दोन ठिकाणी झालेले भानामतीचे प्रकार शहरभर चर्चेचे विषय ठरले. या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय उलथापालथ म्हणजे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांना त्यांचे सासरे विश्वास कदम यांनी, तर अभिजीत नाईक यांना त्यांचे ज्येष्ठ बंधू रणजितसिंह नाईक यांनी पक्षांतर करून पाठिंबा दिला.
निकाल लांबल्याने उमेदवार तणावाखाली
कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही झाले, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची शेवटपर्यंत मनधरणी आणि आश्वासने देण्याची धावपळ सुरू होती. मतमोजणी लांबल्यामुळे रिंगणातील सर्व उमेदवार प्रचंड तणावाखाली आहेत.