अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनच्या बेदाण्यांची आयात, सांगलीतील व्यापाऱ्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:05 IST2025-12-29T16:05:37+5:302025-12-29T16:05:51+5:30
दोन हजार टन बेदाण्याची सांगलीत आवक

अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनच्या बेदाण्यांची आयात, सांगलीतील व्यापाऱ्यांचा गंभीर आरोप
सांगली : आयात करातील सवलतींचा गैरफायदा घेत, अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनमधील बेदाणा भारतात आणल्याचा गंभीर आरोप सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला आहे. चुकीच्या मार्गाने तब्बल दोन हजार टन निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगली जिल्ह्यात दाखल झाला असून, यामुळे स्थानिक शेतकरी आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे सचिव राजेंद्र माळी यांच्यासह मनोज मालू, सुशील हडदरे, भावेश मजेठिया, सांगली बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील, कुमार शेटे, आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आयात प्रक्रियेतील त्रुटी, करचुकवेगिरी आणि बेदाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
सुशील हडदरे आणि मनोज मालू म्हणाले, अफगाणिस्तानातून होणाऱ्या बेदाणा आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याच सवलतीचा गैरवापर करून चीनमधील बेदाणा अफगाणिस्तानमार्गे सांगली जिल्ह्यात आणण्यात आला आहे. या मार्गाने आलेला बेदाणा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.