Sangli Municipal Corporation Election: प्रारूप मतदार यादीचा घोळ, इच्छुक उमेदवारांच्या जीवाला घोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:30 IST2025-12-05T16:27:22+5:302025-12-05T16:30:05+5:30
महापालिका निवडणुका अडीच वर्षे लांबल्या, आता न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची चिंता

Sangli Municipal Corporation Election: प्रारूप मतदार यादीचा घोळ, इच्छुक उमेदवारांच्या जीवाला घोर
सांगली : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटीवर बोट ठेवत आता काहीजण न्यायालयात जाण्याचा इशारा देत आहे. मतदार यादी दुरुस्त करूनच महापालिकेच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही होत आहे. आधीच दोन वर्षे महापालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. त्यात निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. मतदारयादीचा घोळ न्यायालयात पोहोचला तर निवडणुका होणार की पुन्हा लांबणीवर जाणार, असा घोर इच्छुकांच्या जीवाला लागला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत मोठा घोळ उघडकीस आला आहे. यादीतील गोंधळामुळे प्रशासनाला रोषाला तोंड द्यावे लागत आहे. अनेक मतदारांची नावे यादीतून गायब आहेत. जवळपास ७८ हजार मतदारांचे पत्तेच नाहीत. घराला शून्य क्रमांक आहे. त्यामुळे या मतदारांना शोधायचे कुठे? असा प्रश्न पडला आहे. त्यात दुबार आणि बोगस मतदारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एका प्रभागातील मतदारांचा दुसऱ्या प्रभागात समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे यंदा मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडला असून ५ हजार १७७ हरकती दाखल झाल्या आहेत. यात सर्वाधिक २७०० हरकती मिरज शहरातून आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यात काही सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेतला असून मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घ्यावात, अशी मागणी केली आहे. तसे पत्रही निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेतील सदस्यांची मुदत संपून आता अडीच वर्षे होत आली. त्यात निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुकांच्या तयारीलाही वेग आला होता. आता मतदार यादीचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची चिंता इच्छुक उमेदवारांना सतावू लागली आहे.
घरोघरी जाऊन मतदार तपासा : वि.द. बर्वे
महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत महापालिकेकडे हरकत दाखल केली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगालाही पत्र पाठवून निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. प्रारूप मतदार याद्या घरोघरी जाऊन तयार कराव्यात. यादीतील घोळाचा दोष प्रशासनाचा आहे. त्यामुळे नव्या याद्या तयार करण्याचे आदेश द्यावेत. अंतिम मतदार यादी जाहीर झाली तर आम्ही कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांनी दिला आहे.