..तर खासदार संजयकाका पाटलांच्या मुलाच्या लग्नात आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:14 IST2022-04-29T15:59:49+5:302022-04-29T16:14:17+5:30
तासगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ मेपर्यंत निम्मी रक्कम जमा होईल या तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या आश्वासनानंतर तासगावात ...

..तर खासदार संजयकाका पाटलांच्या मुलाच्या लग्नात आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा
तासगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ मेपर्यंत निम्मी रक्कम जमा होईल या तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या आश्वासनानंतर तासगावात शेतकरी आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र ४ मेपर्यंत रक्कम जमा न झाल्यास खासदारांच्या मुलाच्या लग्नात शेतकरी गनिमी काव्याने आंदोलन करून निषेध करतील, असा इशारा माजी सैनिक जोतिराम जाधव यांनी दिला.
तासगाव व नागेवाडीच्या साखर कारखान्याच्या थकीत ऊसबिलासाठी जोतिराम जाधव व शेतकरी गेली १३ दिवस तासगाव तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. थकीत ऊसबिलासाठी तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले.
मात्र प्रशासनही नुसते कागदी घोडे नाचवत असल्याने त्यांनी गुरुवारी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार सकाळी ११ वाजल्यापासून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जमण्यास सुरवात केली होती.
उपोषणस्थळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे व तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी विटा तहसीलदारांकडे आलेले पैसे दोन चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर शेतकऱ्यांनी समाधानी होत आंदोलन मागे घेतले.