Sangli: पत्नी नांदत नसल्याने पतीचे शोले स्टाइल आंदोलन; वायरलेस टॉवरवर चढला, पोलिस कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:03 IST2023-04-25T17:03:20+5:302023-04-25T17:03:39+5:30
आपल्या मागणीकडे पोलिसांनी लक्ष द्यावे म्हणून त्याने पोलिस ठाण्याच्या आवारातील वायरलेस टॉवरवर चढून आंदोलनच केले

Sangli: पत्नी नांदत नसल्याने पतीचे शोले स्टाइल आंदोलन; वायरलेस टॉवरवर चढला, पोलिस कोठडीत रवानगी
जत : पत्नी नांदायला येत नाही म्हणून कर्नाटकातील पतीने जत पोलिस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर चढून शोले स्टाइलने आंदोलन केले. ही घटना जत पोलिस ठाण्यासमोर सोमवारी घडली.
चांदसाब आदमसाव शिवनगी (वय ३५) हा मूळचा कर्नाटकातील हिंचगिरी (ता. इंडी, जि. विजापूर) येथील आहे. जत तालुक्यातील गिरगाव ही त्याची सासुरवाडी आहे. इंडी येथे तो पत्नी व चार मुलांसह राहतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून काैटुंबिक वादाच्या कारणातून पत्नी माहेरी निघून गेली आहे. सासरचे लोक पत्नीला पाठवत नसल्याने चांदसाब याने उमदी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. तेथे दखल न घेतल्याने सोमवारी त्याने जत पोलिस ठाणे गाठत दाद मागितली.
आपल्या मागणीकडे पोलिसांनी लक्ष द्यावे म्हणून त्याने पोलिस ठाण्याच्या आवारातील वायरलेस टॉवरवर चढून आंदोलनच केले. ‘पत्नी माझ्यासोबत येत नाही तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करा, अशी मागणी त्याने लावून धरली.
या प्रकारामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला खाली उतरवले. यानंतर त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला. यानंतर जत न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.