Crime News Sangli: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून, संशयितास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:05 IST2022-06-17T16:03:16+5:302022-06-17T16:05:39+5:30
बोलण्याच्या ओघात बेसावध असल्याची संधी साधत रागाच्या भरात सुनीलने हातानेच गळा आवळून तिला मारून टाकले.

Crime News Sangli: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून, संशयितास अटक
इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील प्रियांका सुनील गुरव (वय २८) या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी तिचा पती सुनील तानाजी गुरव (३१) याला गुरुवारी अटक केली. पत्नी बाहेरख्याली असल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी दिली.
सुनील गुरव गृहरक्षक दलामध्ये जवान म्हणून सेवा बजावत होता. खुनाची घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाघवाडी-शिवपुरी रस्त्यावरील तानाजी बांदल यांच्या शेतामध्ये घडली. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ती उघडकीस आली.
साळुंखे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून सुनील आणि प्रियांकामध्ये वारंवार भांडण होत असे. गेल्या १५ दिवसांपासून ती घराबाहेरच होती. या काळात इस्लामपूर बसस्थानक परिसरात तिचा वावर असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी रात्री सुनीलने इस्लामपूर बसस्थानकावर येऊन प्रियांकाला गोड बोलून तुुझ्यासोबत चर्चा करायची आहे, असे म्हणत तिला दुचाकीवरून बांदल यांच्या शेतामध्ये निर्जनस्थळी नेले.
तेथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत तिला बोलण्यात गुंतवून ठेवली. ती बोलण्याच्या ओघात बेसावध असल्याची संधी साधत रागाच्या भरात सुनीलने हातानेच गळा आवळून तिला मारून टाकले. ती मृत झाल्याची खात्री होत नसल्याने तिचे डोके जमिनीवर आदळले. ती पालथ्या अवस्थेत पडली असताना सुनीलने तेथून पलायन केले.
ही घटना समजल्यानंतर प्रियांकाची ओळख पटविण्याचा कोणताच पुरावा दिसून येत नव्हता. मात्र तिच्याजवळच्या साहित्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाणे आणि क्रमांक असलेली चिठ्ठी मिळून आली. या अक्षराची खातरजमा केल्यावर पोलीस कर्मचारी योगेश जाधव यांचे हे अक्षर असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी येऊन जाधव यांनी ओळख पटवत मृत महिलेचे नाव प्रियांका सुनील गुरव असे असल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सुनील गुरव याचा शोध घेत तुजारपूर गावामध्येच त्याला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.