हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता किर्लोस्करवाडीलाही थांबणार, रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:28 IST2025-10-28T18:27:25+5:302025-10-28T18:28:28+5:30
आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत उपलब्ध होणार

हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता किर्लोस्करवाडीलाही थांबणार, रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील
सांगली : हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता किर्लोस्करवाडी स्थानकातही थांबा घेणार आहे. यानिमित्ताने किर्लोस्करवाडीतून कराड, सातारा व पुण्याला जाण्यासाठी आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत उपलब्ध होणार आहे.
किर्लोस्करवाडीतून हुबळी, धारवाड, बेळगाव व घटप्रभेला आठवड्यातून तीन दिवस या गाडीने जाता येणार आहे. तिला किर्लोस्करवाडीत थांब्यासाठी खासदार विशाल पाटील व सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने पाठपुरावा केला होता. किर्लोस्करवाडी प्रवासी संघटनेतर्फे चंद्रकांत जाधव, डॉ. चंद्रकांत माने, जीवन नार्वेकर यांनीही प्रयत्न केले होते. येत्या काही दिवसांत वंदे भारत एक्स्प्रेसचा किर्लोस्करवाडीत प्रत्यक्ष थांबा अंमलात येईल.
किर्लोस्करवाडी ते पुणे हे अंतर ३ तास ४० मिनिटांचे आहे., तर बेळगावचा प्रवास २ तास ३५ मिनिटांचा आहे. हुबळीसाठी पाच तास लागतात. हुबळी-पुणे एक्स्प्रेस किर्लोस्करवाडीमध्ये सकाळी ९.४५ वाजता येईल. पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचेल. पुणे-हुबळी एक्स्प्रेस प्रत्येक सोमवार, गुरुवार व शनिवारी पुण्यातून दुपारी सव्वादोन वाजता सुटेल. किर्लोस्करवाडीत सायंकाळी ५.४० वाजता येईल. बेळगावला रात्री ८.१५ वाजता, तर हुबळीला १०.४५ वाजता पोहोचेल.