सांगली जिल्ह्यात गारपीटसह जोरदार पाऊस, झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत; पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:46 IST2025-04-03T18:46:14+5:302025-04-03T18:46:28+5:30
ऐतवडे बुद्रुक/लेंगरे/ सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह आज, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

सांगली जिल्ह्यात गारपीटसह जोरदार पाऊस, झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत; पिकांचे नुकसान
ऐतवडे बुद्रुक/लेंगरे/सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह आज, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, कार्वे, डोगरवाडी, शेखरवाडी, शिवपुरी, जक्राईवाडी, लाडेगाव व करंजवडे येथे दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. रस्त्यावर झाडे तुटून पडल्यामुळे इस्लामपूर ते चिकुर्डे व शिराळा ते आष्टा रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. तर चिकुर्डे व डोंगरवाडी येथे यात्रेतील व्यापाऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मका व ऊस पिके भुईसपाट झाली, तर वीट भट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दुपार तीन नंतर परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. तब्बल दोन तास पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे चिकुर्डे ते इस्लामपूर मार्गावरील लाडेगाव व शिराळा ते आष्टा मार्गावरील ऐतवडे बुद्रुक येथे अनेक झाडे रस्त्यावर तुट पडल्यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर झाडे पडल्यामुळे तारा तुटून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या परिसरात मातीच्या वीट भट्टी असल्याने वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान दमदार पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
लेंगरेत विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस
मागील दोन-चार दिवसात वातावरणातील बदलामुळे उष्मा वाढला होता. परिणामी आज सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह गारपीटचा मुसळधार पाऊस झाला. लेंगरे येथे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व व्यावसायिकांचे पावसामुळे हाल झाले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.