काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 22:58 IST2026-01-07T22:58:21+5:302026-01-07T22:58:54+5:30
भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला.

काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
शिराळा - उपवळे (ता. शिराळा) येथे बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळाला. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ११ वर्षांच्या भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले. या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचले आहेत.
नेमकी घटना काय?
संग्राम पाटील यांचे कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जेवण आटोपून शिवम आणि स्वरांजली हे दोघे भाऊ-बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली.
भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र, न डगमगता शिवमने तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला. दरम्यान, मुलांची आई स्वप्नाली यांनीही घटनास्थळी धाव घेत आरडाओरडा सुरू केला. नागरिक जमा झाल्याचे पाहून बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. सुदैवाने, स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाहीत.
या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने सरपंच संभाजी पाटील,प्रवीण पाटील, सुनील गायकवाड,श्रीकांत पवार तसेच कुटुंबियांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉ. निलेश पाटील तिच्यावर उपचार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
तडवळे दुर्घटनेच्या आठवणी ताज्या
तीन वर्षांपूर्वी या गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. उपवळे येथील घटनेने या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
स्वेटर आणि टोपी ठरली 'सुरक्षा कवच'
थंडीमुळे स्वरांजलीने अंगात जाड स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली होती. बिबट्याने तिच्या मानेवर झडप घातली, परंतु टोपी आणि स्वेटरच्या अडथळ्यामुळे बिबट्याची शिकार करण्याची पकड पूर्णपणे बसू शकली नाही. भावाचे शौर्य आणि हे कपडे तिच्यासाठी जीवनदान ठरले.?