विटा : येथील वकील ॲड. विशाल कुंभार यांना झालेल्या मारहाणप्रकरणी विटा पोलिसांनी बुधवारी सीसीटीव्हीचा डीव्हीआर मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. त्याची तपासणी झाल्यानंतर रिट पिटिशन व डीव्हीआरमधील चित्रीकरणात कोणतीही तफावत आढळून आली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. १९ ऑगस्टला कोल्हापूरच्या सर्किट बेंचपुढे होईल, असा आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती ॲड. अनिकेत निकम यांनी दिली.विटा येथील वकील ॲड. कुंभार यांना पोलिसांनी फरपटत नेऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, यासाठी वकील संघटना आक्रमक झाली आहे. ॲड. कुंभार यांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली. १२ ऑगस्टला न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला डीव्हीआर बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर विटा पोलिसांनी बुधवारी हा डीव्हीआर उच्च न्यायालयात हजर केला. न्यायमूर्तींनी या डीव्हीआरची तपासणी करीत याचिकाकर्त्यांना यात पोलिसांनी काही छेडछाड केली आहे का, असा सवाल केला. त्यावेळी कोणतीही छेडछाड झाली नसल्याचे ॲड. निकम यांनी न्यायालयात सांगितले. मात्र, ॲड. कुंभार यांच्या घरातून पोलिसांनी कायदेशीररित्या डीव्हीआर ताब्यात घेतला नाही. जप्ती पंचनामा करून डीव्हीआर ताब्यात घेणे गरजेचे होते. परंतु, त्याबाबत पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून ॲड. कुंभार यांच्यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे ॲड. निकम यांनी न्यायालयात सांगितले.न्यायालयाने हा डीव्हीआर पोलिसांच्याच ताब्यात ठेवण्याचा आदेश दिला. तसेच ही याचिका कोल्हापूर सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रातील असल्याने यापुढील सुनावणी दि. १९ ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या सर्किट बेंचला होईल, असा आदेश दिल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. निकम यांनी सांगितले. त्यामुळे पुढील सुनावणी कोल्हापूरला होणार आहे. या सुनावणीवेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजय जाधव, माजी अध्यक्ष ॲड. सचिन जाधव, ॲड. प्रमोद सुतार, ॲड. महेश शानबाग, ॲड. विशाल कुंभार, ॲड. संजय देसाई, ॲड. संतोष जाधव, सचिव ॲड. सुखदेव कुंभार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.