Sangli- अवघ्या १० दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी, तरीही मिरवणुकीत गेला; वाद्यांच्या दणदणाटात जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:41 IST2023-09-26T16:40:53+5:302023-09-26T16:41:15+5:30
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शेखर सुखदेव पावशे (वय ३२) या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील ध्वनिक्षेपकांचा ...

Sangli- अवघ्या १० दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी, तरीही मिरवणुकीत गेला; वाद्यांच्या दणदणाटात जीव गमावला
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शेखर सुखदेव पावशे (वय ३२) या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील ध्वनिक्षेपकांचा तीव्र आवाज सहन न झाल्याने ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या १० दिवसांपूर्वीच त्याच्या ह्रदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती.
ऐन उत्सवाच्या वातावरणात उमद्या शेखरचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री शेखर एका गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता. त्यावेळी विविध मंडळांसमोर जोरजोराने गाणी वाजत होती. एकावर एक असे बॉक्सचे थर चढवून गाणी वाजवली जात होती. अतिशय तीव्र आवाजाच्या ध्वनिक्षेपकांमुळे संपूर्ण गावात दणदणाट सुरू होता.
मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात भोवळ येऊन पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने तासगावला खासगी रुग्णालयात नेले; पण पुरेशा उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शेखर पावशेचा पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीत तरुणाचा नाहक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.