Hatkanangle LokSabha Constituency: इस्लामपूर-शिराळ्यात जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा कस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:01 PM2024-04-09T17:01:54+5:302024-04-09T17:03:30+5:30

ऊसकरी शेतकऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार

Hatkanangle LokSabha Constituency: Test of Jayant Patil reputation in Islampur-Shirala | Hatkanangle LokSabha Constituency: इस्लामपूर-शिराळ्यात जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा कस

Hatkanangle LokSabha Constituency: इस्लामपूर-शिराळ्यात जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा कस

अशोक पाटील

इस्लामपूर : हातकणंगलेलोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्वबळावर रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि उद्धव सेनेचे (उबाठा) उमेदवार सत्यजित पाटील यांनी नव्यानेच एन्ट्री केली आहे. या तिरंगी लढतीत विविध पक्षांच्या नेत्यांनाच स्वत:च्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागणार आहे. विशेषत: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाचा प्रश्न उभा ठाकणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना ९३ हजार २५० मते मिळाली होती. शिराळा विधानसभा मतदारसंघात ९८ हजार ३४६ मते मिळाली. त्यांच्याच विरोधात असलेल्या धैर्यशील माने यांना इस्लामपूर मतदारसंघात ७४ हजार ७०० तर शिराळा मतदारसंघात ७७ हजार ४२२ मते मिळाली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत राजू शेट्टी यांनी ३९ हजार ४७४ मतांनी आघाडी मिळवली होती.

शेट्टी यांच्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, शाहूवाडी आणि हातकणंगले मतदारसंघात त्यांची पीछेहाट झालेली असताना या दोन विधानसभा मतदारसंघांनी मात्र त्यांना चांगला हात दिला. त्यात आमदार पाटील यांच्यासह शेट्टी यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाला लोकांनी मतपेटीतून दिलेले ते पाठबळ होते.

या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत शेट्टी महाविकास आघाडीत सामील असल्याने त्यांच्या पाठीशी आमदार पाटील यांची ताकद होती. त्यामुळेच धैर्यशील माने यांच्याविरोधात शेट्टी यांना मतांची आघाडी मिळाली. माने यांच्या बाजूने राष्ट्रवादी विरोधातील सर्वच गट एकवटले होते. तरीही झालेल्या पराभवाची शेट्टी यांना आजही खंत आहे. त्यामुळेच या निवडणुकीत शेट्टी यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे.

यावेळी उद्धव सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने चुरशीची तिरंगी लढत रंगणार आहे. सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे चिखली (ता. शिराळा) च्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे गेली पंचवीस वर्षे उपाध्यक्ष आहेत. शिवाय भौगोलिकदृष्ट्या शाहूवाडीशी हा मतदारसंघ संलग्न आहे. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

शिवाय आमदार जयंत पाटील यांची ताकद त्यांच्या पाठीशी असेल. राष्ट्रवादीच्या विरोधातील सगळे गट यावेळीही खासदार माने यांच्यासोबत असतील. साखर टापूतील ऊस उत्पादक कुणाला झुकते माप देणार हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील उमेदवारापेक्षा नेत्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

एका मताची ताकद..

या दोन्ही मतदारसंघात आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद सत्यजित पाटील यांच्या पाठीशी आहे. धैर्यशील माने यांच्या पाठीशी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार यांची ताकद एकवटणार आहे. राजू शेट्टी यांची ऊर्जा ऊस उत्पादक शेतकरी हीच आहे. ऊस दरासाठी संघर्ष करणारे आणि कारखानदारांना अंगावर घेणाऱ्या नेतृत्वाला ताकद द्यायची की नाही, याचा फैसला त्यांच्या एका मतावर होणार आहे.

Web Title: Hatkanangle LokSabha Constituency: Test of Jayant Patil reputation in Islampur-Shirala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.