Sangli: कवलापूर विमानतळासाठी केंद्राकडून हिरवा कंदील, १६५ एकर जागेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावा - मंत्री पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:02 IST2025-11-15T19:00:49+5:302025-11-15T19:02:01+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागेचा शोध घ्यावा, शेतीमाल वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगीची सोय

Sangli: कवलापूर विमानतळासाठी केंद्राकडून हिरवा कंदील, १६५ एकर जागेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावा - मंत्री पाटील
सांगली: कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ विकसित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी लागणारी १६५ एकर जमीन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आली. तसेच देशांतर्गत शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेला विशेष बोगी जोडण्यात येणार असून, मिरज जंक्शनवर शेतीमाल भरण्यासाठी रेल्वेकडून वेळ वाढवण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.
सांगलीत शुक्रवारी जिल्ह्यातील उत्पादित फळपिके व शेतमालाच्या निर्यात व देशांतर्गत विक्रीला चालना देण्यासाठी कृषी विभाग आणि अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादक-खरेदीदार संमेलन आयोजित करण्यात आले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे उपमहाप्रबंधक प्रादेशिक प्रशांत वाघमारे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक कुंभार आणि शेतकरी व निर्यातदार सहभागी झाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कवलापूर येथे कार्गो विमानतळ विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला असून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १६५ एकर जागा उपलब्ध करून दिल्यास विमानतळ तयार करण्यास ते तयार आहेत, असे मंत्रालयाने पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे लवकर विमानतळ उभारून शेतीमालाच्या निर्यातीला चालना मिळेल. तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेला स्वतंत्र बोगी जोडली जाणार असून, मिरज जंक्शनवर शेतीमाल भरण्यासाठी वेळही वाढवण्यात येणार आहे. महिलांनीही उद्योगांमध्ये पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांना कर्ज देण्याची व्यवस्था करावी व शासन व्याजात सवलत देईल. शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावे आणि अपेडा निर्यातीसाठी लागणारी तांत्रिक मदत शेतकऱ्यांना देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पणन संचालक विकास रसाळ म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पणन विभागाचे अधिकारी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करतील. प्रशिक्षण कार्यशाळांमुळे शेतकरी, आडते, व्यापारी आणि हमाल यांना सकारात्मक परिणाम होतील. शेतमालाला योग्य व वाजवी किंमत मिळणे हे पणन कायद्यातील मुख्य वैशिष्ट्य असून, काही मध्यस्थांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी विभाग कडकपणे काम करत आहे.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या माध्यमातून शेतकरी संघटित होत आहेत आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.