राज्यपालांची फटकेबाजी; जयंतरावांची इच्छा म्हणून मी लगेच जाईन असे नव्हे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 07:41 IST2021-09-10T07:41:16+5:302021-09-10T07:41:38+5:30
राज्यपालांची फटकेबाजी; मी महाराष्ट्रातून गेल्यास नुकसान

राज्यपालांची फटकेबाजी; जयंतरावांची इच्छा म्हणून मी लगेच जाईन असे नव्हे!
सांगली : नेहमी अतिवृष्टी, पूर अशी संकटे असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असायची; पण मी आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय, पूर येतोय; पण जयंत पाटील यांची इच्छा म्हणून मी लगेच परत जाईन असे नाही, अशी फटकेबाजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.
मी गेल्यास नुकसान होईल. आता काय नुकसान होत आहे का, अशी विचारणाही त्यांनी जयंत पाटील यांना केली. राज्यपालांच्या मिश्कील राजकीय कोट्यांना उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.
दोन पाटील आणि...
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे दीपाली भोसले-सय्यद ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांच्या मुलींना मदत प्रदान कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्यारी गुरुवारी येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांनी दिलखुलास फटकेबाजी केली. ते म्हणाले की, दोन पाटलांच्या (जलसंपदा मंत्री जयंत पाटील व केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील) मध्ये बसण्याची संधी मिळाली. दीपाली भोसले-सय्यद यांच्या कामाबद्दल सरकारने सत्कार करावा, यामुळे आणखी लोक मदतीसाठी पुढे येतील. अनेकांकडे पैसे आहेत, सगळेच माझ्यासारखे गरीब नाहीत!