सांगली महापालिकेच्या नोकर भरतीत शासनाचा अडथळा, दोन हजार पदे रिक्त; नागरी सुविधांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:42 IST2026-03-03T18:42:03+5:302026-03-03T18:42:38+5:30
आकृतिबंध मंजूर करताना शासनाकडून अनेक बंधने

संग्रहित छाया
शीतल पाटील
सांगली : महापालिकेतील कर्मचारी संख्या सातत्याने घटत असताना नोकर भरतीचा प्रश्न मात्र प्रलंबितच आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होत असूनही नवीन भरती होत नसल्याने प्रशासनासमोर मनुष्यबळाचे मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने ३४५४ पदांचा आकृतिबंध मंजूर केला असला तरी नोकर भरतीसाठी लागू असलेली ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट महापालिकेस अडसर ठरत आहे. त्यामुळे सुमारे दोन हजार पदे रिक्त राहिली आहेत. याचा थेट परिणाम नागरी सुविधा व सेवा वितरणावर होत असून, भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वीस वर्षांत महापालिकेत नोकर भरती झालेली नाही. महापालिकेच्या स्थापनेवरील आस्थापनेवर २३३७ पदे मंजूर होती. त्यात दरवर्षी ६० ते ७० जण सेवानिवृत्त झाले. आतापर्यंत १३५५ पदे कार्यरत आहेत. महापालिकेने दोन वर्षांपासून नवीन आकृतिबंध तयार केला. यात नव्याने २४६७ पदांची निर्मिती केली. पण शासनाने ३५५४ पदांचा आकृतिबंध मंजूर केला. त्यालाही आता दोन वर्षे लोटली आहेत. नवीन आकृतिबंधाचा विचार करता, दोन हजार पदे रिक्त आहेत. यात तांत्रिक व अत्यावश्यक सेवेतील पदांचाही समावेश आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या नागरी सुविधांच्या गरजा लक्षात घेता, महापालिकेला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत नोकर भरतीच न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. महापालिकेने पाणीपुरवठा, नगररचना, बांधकाम विभागासह अनेक जागांवर मानधनावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर महापालिकेचा गाडा सुरू आहे.
परिणामी, अनेक विभागांमध्ये एकाच कर्मचाऱ्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविल्या जात असून, कामकाजाच्या गतीवर परिणाम होत आहे. मनुष्यबळाअभावी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व अभियांत्रिकी विभागांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून, नागरिक सेवांवर परिणाम होत आहे.
आकृतिबंध मंजूर करताना शासनाकडून अनेक बंधने
महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करताना शासनाने अनेक बंधने लादली आहेत. महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्के लक्षात घेऊन पदे भरण्याची दक्षता घ्यावी, आस्थापना खर्च पाहता शासन मान्यता घेतल्याशिवाय नोकरभरती करू नये, पदभरती झाल्यास महापालिकेला वाढीव निधी दिली जाणार नाही, अशा काही अटी घातल्या आहेत. सध्या महापालिकेचा आस्थापना खर्च ६० ते ६५ टक्क्यापर्यंत आहे. त्यामुळे महापालिकेला नोकर भरतीसाठी शासनाची मान्यता मिळणे दुरापास्त झाले आहे.
८० पदांचा प्रस्ताव धूळखात
महापालिकेला नगररचना, बांधकाम विभागाकडील शाखा अभियंत्यासह तांत्रिक पदांची कमतरता जाणवत आहे. त्यासाठी मानधनावर शाखा अभियंते नियुक्त केले आहेत. पण त्यांना सह्यांचे अधिकार नाही. केवळ तीन ते चार कायम अभियंत्यांवर महत्त्वाच्या विभागांचा ताण आहे. त्यासाठी महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी ८० तांत्रिक पदे भरण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. पण त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
शासन मंजूर पदे - नवनिर्मित पदे - एकूण पदे
२३४०--१११४--३४५४