सरकार म्हणते तत्काळ काम करा, महापालिका म्हणते ताबडतोब थांबवा; सांगलीतील पाइपद्वारे गॅसपुरवठा रखडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:12 IST2026-03-30T19:12:26+5:302026-03-30T19:12:50+5:30
गॅसटंचाईच्या काळात कामात खोडा

सरकार म्हणते तत्काळ काम करा, महापालिका म्हणते ताबडतोब थांबवा; सांगलीतील पाइपद्वारे गॅसपुरवठा रखडणार
सांगली : गॅस पुरवठ्याबाबत राज्यात टंचाईची स्थिती असल्याने पाइपद्वारे गॅस योजनेची कामे युद्धस्तरावर राबविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सांगलीत मात्र काम थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील घरोघरी गॅसपुरवठा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्याच्या युद्धजन्य स्थितीत सर्वत्र गॅस सिलिंडर पुरवठ्यावर ताण पडत असल्याच्या स्थितीत पाइपद्वारे गॅस पुरवठ्याचे महत्त्व वाढले आहे. राज्य शासनानेही पाइद्वारे गॅस पुरवठ्याची कामे गतीने करण्याचे आदेश दिले आहेत. नगरविकास विभागाने या संदर्भात शुक्रवारी आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे एलपीजी उपलब्धतेवर मर्यादा आल्या आहेत. या ऊर्जासंकटाला तोंड देण्यासाठी पाइपद्वारे गॅसजोडण्यांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याला अनुसरून कार्यवाही करावी.
शासनाने असे आदेश दिलेले असताना सांगलीत मात्र महापालिकेने गॅसवाहिनीचे काम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आदेश दिले की, गॅस कंपनीकडून महापालिकेशी समन्वय न ठेवता खोदकाम केले जात असल्याने जलवाहिन्या, ड्रेनेजवाहिन्या फुटत आहेत. त्यामुळे काम तातडीने थांंबवून झालेल्या कामाची चौकशी करावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास गॅस कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. दरम्यान, शासनाने दिलेल्या आदेशात महापालिकेचे सर्व आक्षेप खोडून काढण्यात आल्याचे दिसत आहे.
२४ तासांत परवानगीचे शासनाचे आदेश
शासनाने जारी केलेल्या आदेशांत म्हटले आहे की, शहरातील गॅस वितरणाबाबत महापालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा व अन्य विभागांकडे परवानगीसाठीचे अर्ज प्रलंबित असतील, तर ते मंजूर झाल्याचे गृहीत धरावे. या संस्थांनी गॅस वितरणासाठी २४ तासांत परवानगी द्यावी. गॅस कंपन्यांना परवानगीसाठी शुल्क माफ करावे. खोदकाम केले असल्यास रस्ते पूर्ववत करण्यासाठी शुल्क घेऊ नये. गॅस कंपनीला शहरांत २४ तास काम करण्याची परवानगी असेल, शिवाय कोणत्याही हंगामात ते काम करू शकतील.
वाहतूक पोलिस, अग्निशमनच्या परवानगीची गरज नाही
शासनाने आदेशात असेही म्हटले आहे की, गॅस कंपन्यांना खोदकाम, पाइपलाइन टाकणे, रस्ता पूर्ववत करणे या कामांसाठी वाहतूक पोलिस किंवा अग्निशमन विभागाच्या परवानगी किंवा ना हरकत दाखल्याची गरज नाही. कंपनीने दररोजच्या कामाची यादी त्यांना माहितीसाठी द्यावी. हे आदेश ३० जूनपर्यंत अमलात राहतील.
महापालिका क्षेत्रात २८ हजार घरांना प्रतीक्षा
महापालिका क्षेत्रात २९ हजार जोडण्यांपैकी १२०० कुटुंबांना गॅसपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे ही कुटुंबे सध्याच्या टंचाईकाळात निर्धास्त आहेत. ईश्वरपूरमध्ये ६००० जोडण्यांपैकी ३०० कुटुंबांना गॅसपुरवठा सुरू झाला आहे. आष्ट्यामध्ये १२०० जोडण्या दिल्या असल्या, तरी तेथे अद्याप प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नाही.