Sangli: कवलापूर विमानतळासाठी शासन अनुकूल, मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:31 IST2025-10-01T19:31:05+5:302025-10-01T19:31:44+5:30
अतिरिक्त जमीन अधिग्रहण करणार

Sangli: कवलापूर विमानतळासाठी शासन अनुकूल, मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक
सांगली : कवलापूर येथील प्रस्तावित विमानतळ उभारणीसाठी शासन अनुकूल असून व्हिजिबिलिटी हवालाच्या आधारे विमानतळाची योजना शक्य आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे कवलापूर विमानतळाच्या कामाला गती आली आहे.
मुंबईत कवलापूर विमानतळाबाबत मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार सुरेश खाडे, आमदार डाॅ. विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे हे व्हिडीओ काॅन्सरन्सद्वारे सहभागी झाले होते.
या बैठकीत उद्योगमंत्री सामंत यांनी कवलापूर परिसर विमानतळ उभारणीसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. व्हिजिबिलिटी रिपोर्टच्या आधारे विमानतळाची योजना शक्य आहे; तसेच अतिरिक्त जमिनीची गरज असल्यास सरकार ती अधिग्रहित करून विमानतळ प्रकल्पासाठी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही दिली.
आमदार गाडगीळ यांनी सांगली-मिरज विधानसभा क्षेत्र हे उद्योग, शेती, शिक्षण व आरोग्य उपचार यांसाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर जोडले गेले आहे. या विमानतळामुळे प्रवास व वाहतूक सुलभ होईल आणि उद्योगधंद्यांना नवे बळ मिळेल. बैठकीत विमानतळाच्या पायाभूत कामांबाबत चर्चा झाली. प्रलंबित मुद्द्यांवर मार्ग काढून ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेण्याचे निश्चित झाले.
कवलापूर येथे लवकरच कार्गो विमानतळाचे स्वप्न साकार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रस्तावित कार्गो विमानतळासाठी उपलब्ध जागा व त्यात ५० एकर अधिकची जागा लागेल. जिल्ह्यातील उत्पादक क्षमतावाढीसह प्रक्रिया उद्योगासाठी विमानतळ आवश्यक आहे. उद्योगधंदे वाढीस लागून रोजगार निर्मिती व जिल्ह्याची आर्थिक उन्नती होण्यासाठी विमानतळ मोलाची भूमिका बजाविणार आहे. या कामासाठी कवलापूर विमानतळ बचाव कृती समिती आवश्यक ते सर्व सहकार्य करील. - सतीश साखळकर, विमानतळ बचाव कृती समिती, सांगली