पितळ उघडे होऊ नये म्हणून पडळकर आंदोलनात उतरले, विक्रम सावंत यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:28 IST2025-09-20T14:28:07+5:302025-09-20T14:28:38+5:30
पडळकर यांच्याविरोधात जतमध्ये निषेध रॅली

पितळ उघडे होऊ नये म्हणून पडळकर आंदोलनात उतरले, विक्रम सावंत यांचा आरोप
जत : कनिष्ठ अभियंते अवधूत वडार यांच्या निधनाविषयी त्यांच्या कुटुंबाने संशय व्यक्त करत तक्रार केल्यानंतर मृत्यूमागचे सत्य बाहेर येईल अन आपले पितळ उघडे पडेल म्हणून गोपीचंद पडळकर यांनी या घटनेला वेगळं वळण देण्याचे काम केले, अशी टीका माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली.
जतमध्ये पडळकर यांच्याविरोधात छत्रपती संभाजी चौक ते जत पोलिस ठाण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी सावंत म्हणाले, दरम्यान, जत पंचायत समितीचा मनरेगा घोटाळा राज्यभर चर्चेत आला. जतच्या जनतेला योजनेपासून अनेक वर्षे वंचित राहावे लागले. पुन्हा तोच प्रकार बांधकाम विभागात सुरू होता. काही लोकांना पाठीशी घालण्याचे काम पडळकर करत आहेत. मात्र, अवधूत वडार यांच्या मृत्यूचे सत्य जोपर्यंत जनतेसमोर येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. पोलिसांनी देखील नि:पक्षपातीपणे तपास करावा.
वाचा- तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही; बापू बिरूंच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना थेट इशारा
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब म्हणाले, विकासासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. मात्र, ती पूर्ण होत नाही म्हणून जनतेच लक्ष वेगळ्या दिशेने वळविण्याचे काम आमदार पडळकर करत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
वाचा: गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर इस्लामपूरचे राजकारण पेटले
यावेळी बाबासाहेब कोडग, महादेव पाटील, रमेश पाटील, स्वप्निल शिंदे, राम सरगर, ॲड. चानाप्पा होर्तिकार, अण्णासाहेब कोडग, सिद्धू शिरसाड, निलेश बामणे, महादेव अंकलगी, महादेव हिंगमिरे, उत्तम चव्हाण, शिवाजी शिंदे, युवराज निकम, हेमंत खाडे, बंटी दुधाळ, गणी मुल्ला, लक्षण ऐडके, सचिन जगताप, साहेबा कोळी, आदी सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व राजारामबापू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.