'राष्ट्रपती पदक विजेत्यांना विमानप्रवासात सवलती द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:01 IST2022-12-09T14:01:13+5:302022-12-09T14:01:42+5:30
सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सेवाभावी संस्था व पोलिस बॉईज संघटनेतर्फे राज्यभरातील जिल्हा मुख्यालयात निवेदने देण्यात आली

'राष्ट्रपती पदक विजेत्यांना विमानप्रवासात सवलती द्या'
सांगली : राष्ट्रपती पदक विजेत्या सेवानिवृत्त व विद्यमान पोलिस कर्मचाऱ्यांना विमानप्रवासात ७५ टक्के सवलतीची मागणी करण्यात आली. सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सेवाभावी संस्था व पोलिस बॉईज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यभरातील जिल्हा मुख्यालयात निवेदने देण्यात आली.
संघटनेच्या अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने त्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. मागण्या अशा : ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना १ जुलैची वेतनवाढ लागू व्हावी. निवृत्तीनंतर आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात. ३० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक पदाचे लाभ मिळावेत. सेवानिवृत्त व विद्यमान पोलिसांना पथकर माफी मिळावी, निवृत्तीनंतरही साक्षीसाठी न्यायालयात जाणाऱ्यांना एसटी प्रवास मोफत असावा,
राष्ट्रपती पदक विजेत्यांच्या नावाचा फलक आयुक्तालयावर लावावा, आगाऊ वेतनवाढ द्यावी, रेल्वे व एसटीमध्ये मोफत प्रवास मिळावा, सैनिकी कॅन्टीनच्या धर्तीवर पोलिस कॅन्टीनमधील वस्तूंनाही जीएसटीमधून सूट द्यावी, मॅट प्राधिकरणातील न्यायाधीशांची संख्या वाढवून दाव्यांची निर्गत गतीने करावी, सन २०१३ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना उपनिरीक्षकपदी नियुक्ती तातडीने द्यावी.