बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 15:40 IST2023-08-17T15:38:24+5:302023-08-17T15:40:41+5:30
पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तेथून पिटाळून लावले.

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक
सदानंद औंधे
मिरज : हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांनी दिल्लीत संसद भवनाच्या आवारात निदर्शने केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तेथून पिटाळून लावले.
शिवसेना शहर उपप्रमुख किरण कांबळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी दि. ११ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांसह मिरजेतून दिल्लीला गेले. मात्र स्वातंत्र दिनानिमित्त दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त व जमावबंदी असल्याने त्यांना जंतर मंतर, इंडिया गेट, राजघाट, संसद भवन परिसरात आंदोलनास प्रवेशास पोलिसांनी प्रतिबंध केला.
संसद भवन आवारात प्रवेश मिळाला नसल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीत इंडिया गेट समोर भारतरत्न सन्मान मिळावा या मागणी बॅनर हातात घेऊन किरण कांबळे यांच्यासह इंजनिअर सौरभ कांबळे, सुनील खरात, राहुल शेठ, अनुष गायकवाड या कार्यकर्त्यानी घोषणा देण्यास सुरु केल्याने त्यांना पोलिसांनी तेथून पिटाळले.
शिवसेना कार्यकर्त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापुढेही आंदोलन करणार असल्याचे किरण कांबळे यांनी सांगितले.