Sangli - वारणा डावा कालव्यात अडकला गवा, वनविभागाने तीन तासांच्या अथक प्रयत्नाने केली सुरक्षित सुटका
By श्रीनिवास नागे | Updated: March 28, 2023 16:50 IST2023-03-28T16:49:39+5:302023-03-28T16:50:33+5:30
पुनवत (जि. सांगली ) : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे वारणा डावा कालव्यात अडकलेल्या गव्याची वनविभागाच्या पथकाने सुमारे तीन ...

Sangli - वारणा डावा कालव्यात अडकला गवा, वनविभागाने तीन तासांच्या अथक प्रयत्नाने केली सुरक्षित सुटका
पुनवत (जि. सांगली) : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे वारणा डावा कालव्यात अडकलेल्या गव्याची वनविभागाच्या पथकाने सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नाने सुरक्षित सुटका केली. थकलेल्या अवस्थेतील गवा जंगलाच्या दिशेने निघून गेला.
शिराळे खुर्द - फुपेरे गावच्या हद्दीवर पावले वस्तीनजीक मादी जातीचा गवा वारणा डावा कालव्यात उतरला होता. या परिसरात कालव्याला अस्तरीकरण असल्याने गव्याला कालव्यातून बाहेर पडता येत नव्हते. वाट शोधण्यासाठी गवा कालव्यात येर-झाऱ्या मारत होता. ही माहिती मिळताच वनविभाग, बिळाशीचे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. एन. पाटील, बिऊरचे वनरक्षक हणमंत पाटील यांच्यासह अमर पाटील, तानाजी खोत, सचिन पाटील, संजय पाटणकर, चंद्रकांत पाटील, शिवाजी सावंत आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शिराळे खुर्द, फुपेरे येथील ग्रामस्थही येथे मोठ्या संख्येने जमले होते.
वनविभागाने जेसीबीच्या साहाय्याने रस्ता करून गव्याला योग्य दिशेला कालव्याबाहेर काढले. हे काम जवळपास तीन तास चालले होते. गवा थकलेल्या अवस्थेत दिसत होता. गव्याला कालव्याबाहेर काढण्यासाठी वन विभागाला ग्रामस्थानीही सहकार्य केले. कालव्यातून बाहेर आल्यानंतर गवा पूर्वेच्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. वन कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. वन्य प्राण्यांबाबत सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.