Sangli: पुनवतमध्ये शाळकरी विद्यार्थ्यावर गव्याचा हल्ला, शिंग कपड्यात अडकून कपडे फाटले अन् दूरवर फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 14:59 IST2023-04-22T14:36:41+5:302023-04-22T14:59:39+5:30
वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगवले

Sangli: पुनवतमध्ये शाळकरी विद्यार्थ्यावर गव्याचा हल्ला, शिंग कपड्यात अडकून कपडे फाटले अन् दूरवर फेकले
सहदेव खोत
पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथे प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या तराळकी नावाच्या शिवारात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास नागरिकांना गव्याचे दर्शन झाले. यावेळी बघ्यांच्या गर्दीत काहींनी गव्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिथरलेल्या गव्याने केलेल्या हल्ल्यात एक शाळकरी विद्यार्थी बचावला. दरम्यान, वनविभागाने घटनास्थळी ताबडतोब धाव घेऊन गर्दीला पांगवले.
पुनवत येथे प्राथमिक शाळेच्या पाठीमागील शिवारात शनिवारी सकाळी नागरिकांना गवा दिसला. ही माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली. शेतात बसलेल्या गव्याला काहींनी हुसकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिथरलेल्या गव्याने तिथे असलेल्या आदित्य प्रशांत पाटील या शाळकरी विद्यार्थ्यावर हल्ला केला. त्यात गव्याचे टोकदार शिंग त्याच्या कपड्यात अडकून कपडे फाटले व त्याला गव्याने दूरवर फेकले. मात्र, त्याला कोणतीही जखम न झाल्याने तो बचावला. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने गवा दुसऱ्या शेतात गेला.
दरम्यान, गवा आल्याची माहिती मिळताच वनरक्षक प्रकाश पाटील, वन कर्मचारी अमर पाटील, तानाजी खोत, पोलिस पाटील बाबासाहेब वरेकर, संजय पाटणकर, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना त्या ठिकाणाहून दूर केले. ग्रामपंचायतीने ध्वनिक्षेपकावरून शेतकऱ्यांनी शेतात वावरताना काळजी घेण्याची सूचना दिली.