सांगलीत फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, गावभाग परिसर हादरला; जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:09 IST2025-02-03T13:08:13+5:302025-02-03T13:09:40+5:30
अपार्टमेंटच्या काचा फुटल्या, नागरिक धावले

छाया-सुरेंद्र दुपटे
सांगली : गावभागातील बावडेकर वाड्याजवळील परिसर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरला. एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामुळे शेजारील आठ ते दहा अपार्टमेंटमधील खिडक्यांच्या काचा फुटून चक्काचूर झाला. तर मोटारींच्या काचांना तडे गेले. स्फोटाच्या आवाजाने अनेकजण घाबरून रस्त्यावर धावले. स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही.
गावभाग परिसरात बावडेकर वाड्याजवळ स्वकुल अपार्टमेंट आहे. पाठीमागील अपार्टमेंटमध्ये केटरिंगचा व्यवसाय करणारे राजेंद्र गोडसे हे पत्नी व मुलासह राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये केटरिंगसाठी लागणारी भांडी, ताटे, गॅस सिलिंडर असे साहित्य असते. रविवारी सकाळी गोडसे दाम्पत्य कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यांचा फ्लॅट बंद होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक त्यांच्या फ्लॅटमध्ये गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणून गेला.
स्फोटाच्या आवाजानंतर आजूबाजूच्या आठ ते दहा फ्लॅटच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. आवाज कशाचा आणि काय घडले? हे कोणालाच कळेना. त्यामुळे रविवारची सुटी असल्यामुळे घरात असलेले नागरिक, महिला, तरुण पटापट बाहेर पडून रस्त्यावर धावत सुटले. आसपासचा अर्धा किलोमीटरचा परिसर स्फोटाच्या आवाजाने हादरला होता. काही वेळातच गोडसे यांच्या फ्लॅटमधून स्फोट झाल्याचे समजले. त्यांच्या फ्लॅटमधील भांडीकुंडी विखुरली गेली होती. फ्लॅटचा बाहेरील दरवाजा, आतील दरवाजा मोडून पडला होता. दोन्ही बाजूच्या खिडक्यांचे लोखंडी ग्रील उडून फेकले गेले. दोन पाण्याच्या टाक्याही फुटल्या. प्लास्टिकची ताटे उडून गेली होती. शेजारील अपार्टमेंटच्या खिडक्यांच्या काचा फुटून सर्वत्र खच पडला होता.
शेजारील अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेल्या दोन मोटारींच्या काचांना तडे गेले. गोडसेंच्या फ्लॅट शेजारीच राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेच्या घरातील काचाही फुटल्या होत्या. स्फोटाची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह महापालिका अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते.
मोठा अनर्थ टळला
राजेंद्र गोडसे यांच्या फ्लॅटमध्ये चार सिलिंडर होते. त्यापैकी दोन सिलिंडर भरलेले होते. तिसरा रिकामा अन् चौथा अर्धा होता. एका सिलिंडरचा स्फोट झाला. गोडसे कुटुंब बाहेर गेल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तसेच अन्य सिलिंडर सुरक्षित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
स्फोटाच्या कारणांचा तपास
गोडसे यांच्या फ्लॅटमधील एक सिलिंडर गॅस गिझरला जोडला होता. या सिलिंडरमधून गॅस गळती होत फ्लॅटमध्ये गॅस पसरला असावा. दारे, खिडक्या बंद असल्याने दाब वाढून स्फोटाची घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. गॅस कंपनीचे अधिकारी याचा तपास करत आहेत.