रात्री मारहाण करणाऱ्या मित्राचा सकाळी भोसकून खून, बुधगावातील घटना; हल्लेखोरास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 00:59 IST2025-07-04T00:58:54+5:302025-07-04T00:59:26+5:30
हल्लेखोर मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

रात्री मारहाण करणाऱ्या मित्राचा सकाळी भोसकून खून, बुधगावातील घटना; हल्लेखोरास अटक
सांगली : कामाच्या वादातून मित्राने रात्री मारहाण केल्याच्या रागातून भर चौकात त्याचा चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार बुधगाव (ता. मिरज) येथे घडला. गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. सिकंदर मौला शिकलगार (वय ५२, रा. बुधगाव) असे मृताचे नाव आहे. हल्लेखोर मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिकलगार आणि पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत. शिकलगार हा सेंट्रिंगची काम घेत होता. तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होता. बुधगाव येथील एका ‘आरसीसी’ चेंबरचे काम शिकलगार यास दिले होते. शिकलगार याने पट्टेकरी याला हाताखाली घेऊन कामास प्रारंभ केला होता. शिकलगार व पट्टेकरीला दारूचे व्यसन होता. त्यामुळे ज्यांचे काम होते, त्या मालकाने त्यांना ‘तुम्ही दारू पिऊन येता, त्यामुळे माझ्याकडे कामाला येऊ नका’ असे बजावले होते. त्यानंतर शिकलगार याच्याकडून चेंबरचे काम काढून घेण्यात आले.
मालकाने पुन्हा हे काम पट्टेकरी याच्याकडे देण्यात आले. शिकलगार याला हा प्रकार समजताच तो पट्टेकरीवर चिडला. बुधवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. शिकलगार याने त्याला ‘माझ्याकडून काढून घेतलेले काम तू का करतोस’ असा जाब विचारला. तसेच त्याला रागातून मारले. या मारहाणीचा पट्टेकरी याला राग आला होता.
गुरूवारी सकाळी उठल्यानंतर देखील पट्टेकरी याला शिकलगारने रात्री केलेल्या मारहाणीचा राग उफाळून आला. त्याने घरातील भंगारात पडलेला चाकू शोधून काढला. सकाळी साडेआठच्या सुमारास पट्टेकरी चाकू घेऊन झेंडा चौकात आला. त्याठिकाणी उभा असलेल्या शिकलगार याला चाकूने भोसकले. छातीवर एकच वार खोलवर झाल्यामुळे शिकलगार गंभीर जखमी होऊन खाली पडला. तेव्हा पट्टेकरी चाकू घेऊन तसाच थांबून राहिला होता.
सांगली ग्रामीण पोलिसांना डायल ११२ वरून हल्ल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी शिकलगार याला नातेवाईकांनी उपचारासाठी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पट्टेकरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिकलगार याचा भाचा शब्बीर रसूल शिकलगार याने फिर्याद दिली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी भेट दिली.
एकच खोलवर वार
रात्री मारहाण केल्याच्या रागातून पट्टेकरी याने शिकलगार याच्यावर एकच वार करून खून केला. खुनानंतर त्याने पोलिसांना कबुली दिली. पट्टेकरी हा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. परंतु त्याच्या व्यसनाला कंटाळून पत्नी दोन मुलांसह पुण्यात राहते. पट्टेकरी हा वृद्ध आईसोबत बुधगावात राहत होता.