Sangli: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अपहार, चार वर्षांपासून प्रकार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:24 IST2025-03-08T14:23:20+5:302025-03-08T14:24:07+5:30

कारवाईकडे लक्ष लागून राहिले 

Fraud by using forged signatures of medical officers at Bavchi Primary Health Center in Sangli district | Sangli: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अपहार, चार वर्षांपासून प्रकार सुरु

संग्रहित छाया

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून पैसे उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी प्रशासनाने चौकशीची प्रक्रिया सुरू केली असून, कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे.

यासंदर्भात आरोग्य केंद्राच्या प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे धाव घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार अपहाराचा आकडा सव्वालाखापर्यंत पोहोचला आहे. कोरोनाकाळापासून सुरू असलेला अपहाराचा प्रकार नुकताच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नजरेस आला. या केंद्रातील यापूर्वीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची २०२१ मध्ये अन्यत्र बदली झाली. बदलीनंतर त्यांच्या नावे बॅंकेत असणारी विविध खाती नव्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नावे चालवली जातात. या लिपिकाने येथेच चलाखी केली. नवे वैद्यकीय अधिकारी रजू झाले, तरी लिपिकाने बॅंकेचे खाते मात्र जुन्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे सुरू ठेवले. 

रुग्णकल्याण समिती, ग्रामीण आरोग्य अभियान यासह काही खात्यांचे आर्थिक व्यवहार जुन्या अधिकाऱ्यांच्या नावे सुरू ठेवले. त्यासाठी त्यांच्याच खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. गेली चार वर्षे हा प्रकार सुरू होता. सध्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना महिनाभरापूर्वी ही चलाखी लक्षात आली. त्यांनी तातडीने वरिष्ठांना हा प्रकार कळविला. त्यानंतर चौकशी आणि कारवाईची चक्रे फिरू लागली आहेत. गुरुवारी जिल्हा परिषदेचे अधिकारी केंद्रात येऊन माहिती घेऊन गेले. प्राथमिक अंदाजानुसार अपहाराचा आकडा सव्वालाखाहून अधिक असावा. संबंधित लिपिकाने कोणकोणत्या खात्यांमध्ये गफला केला हे खातेनिहाय चौकशीमध्ये नेमके स्पष्ट होणार आहे.

कारवाईकडे लक्ष

दरम्यान, सरकारी सेवेत असतानाही थेट फसवणूक आणि आर्थिक हेराफेरी केल्याने संबंधित लिपिकावर निलंबन, फौजदारी गुन्हा आणि प्रसंगी बडतर्फी अशी कारवाई होऊ शकते. जिल्हा प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. अन्य खात्यांची चौकशी केली असता हेराफेरीचा आकडा वाढू शकतो. चौकशी आणि कारवाई टाळण्यासाठी लिपिकाने धावपळ सुरू केली आहे.

बावची प्राथमिक आरोग्य केंद्राची वरिष्ठ कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे आहे. - डॉ. सुनंदा पाटील, प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, बावची

Web Title: Fraud by using forged signatures of medical officers at Bavchi Primary Health Center in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.