उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:33 IST2022-04-13T14:32:29+5:302022-04-13T14:33:00+5:30
सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.

उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप
भिलवडी : महाबीज ही सरकारची कंपनी आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी बियाणे प्लॉटचे आमिष दाखवून लागवड करण्यास भाग पाडले. त्याला पीक लागत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. सोयाबीनच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना फसविले असून ते कृषी मंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
भिलवडी (ता. पलूस) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, बाळासाहेब मगदूम, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले की, मायनर इरिगेशन विभागाची जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केलेली वसुली तत्काळ थांबवली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन निकराची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी कटिबद्ध आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.
ते म्हणाले की, एफआरपीनुसार उसाला दर, बाजारभावानुसर शेतीमालाला दर, शेतीसाठी नुकसानभरपाई, महापुरातील शेती पिकाची भरपाई आदीबाबत सरकार कोणतीच ठाम भूमिका घेत नाही. जे सरकार व नेते बांधिलकी तोडून स्वार्थाचे राजकारण करणार असतील, त्यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणतेच संबंध ठेवणार नाही.