Sangli: अपघातात चौघे मित्र जखमी झाले, उपचारानंतर दुचाकी घ्यायला गेले; पण..
By संतोष भिसे | Updated: March 9, 2024 15:47 IST2024-03-09T15:47:23+5:302024-03-09T15:47:42+5:30
सांगली : अपघातात जखमी झालेल्या तरुणांची दुचाकी चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रकार सांगलीत घडला. याप्रकरणी संजय अजित दावणे (वय २१, ...

Sangli: अपघातात चौघे मित्र जखमी झाले, उपचारानंतर दुचाकी घ्यायला गेले; पण..
सांगली : अपघातात जखमी झालेल्या तरुणांची दुचाकी चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रकार सांगलीत घडला. याप्रकरणी संजय अजित दावणे (वय २१, रा. १०० फुटी रस्ता, इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.
सांगलीत बायपास रस्त्यावर घाटगे रुग्णालय ते पट्टणशेट्टी दुचाकी शोरुमदरम्यान २५ फेब्रुवारीरोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दावणे यांना अपघात झाला होता. मित्र नागेश शिंदे, पिंटू सुरेश ऐवळे व लखन भगवान वायदंडे यांच्यासमवेत ते मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पण तिकीट न मिळाल्याने चौघेही दुचाकीवरुन (एमएच १० सीजे ५८९२) परतत होते. त्यावेळी दुचाकी घसरुन अपघात झाला. यात चौघेही जखमी झाले.
जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त दुचाकी जागेवरच पडली होती. थोड्या वेळाने दावणे व पिंटू ऐवळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते दुचाकी ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी गेले, मात्र तेथे गाडी आढळली नाही. बेवारस पडलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर शहर पोलिसांत तक्रार दिली.