Sangli: शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नववर्षात चार बिबट्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:31 IST2025-01-30T16:31:16+5:302025-01-30T16:31:41+5:30
१७६ पाळीव प्राण्यांचा मृत्यू

Sangli: शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नववर्षात चार बिबट्यांचा मृत्यू
विकास शहा
शिराळा : शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नवीन वर्षात चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन बिबटे विहिरीत पडल्याने, एक बिबट्या गाडीला धडकल्याने तर एका बिबट्याचा वयोवृद्ध झाल्याने मृत्यू झाला आहे. चार बिबट्यांचा मृत्यू आणि बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना चिंताजनक आहेत.
रेठरे धरण (ता. वाळवा) येथे बुधवार, दि. २९ जानेवारी रोजी विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. नववर्षात दि. ४ जानेवारी रोजी नेर्ले (ता. वाळवा) येथे वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. दि. ६ जानेवारी रोजी फुपिरे येथे बिबट्याचा मृत्यू वयोवृद्ध झाल्याने झाला होता. दि. ११ जानेवारी रोजी करमाळे येथील खासगी विहिरीत पडल्याने सहा ते सात महिन्यांच्या बछडा मादीचा मृत्यू झाला. दि. २० डिसेंबर रोजी जांभळेवाडी येथील ओढ्याकाठी ५ ते ६ वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला होता.
या अगोदर १४ सप्टेंबर २००४ रोजी खेड तालुक्यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या नर बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. २०१६ साली वाकाईवाडी येथे दोन तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. १ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.
शेडगेवाडी-खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा जलसेतूवरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इटकरे (ता. वाळवा) येथे बिबट्याचा मृत्यू झाला. २०२३ ला चव्हाणवाडी येथे अर्धवट शव असणारा बिबट्या सापडला होता.
- २७ फेब्रुवारी २०२२ ला रेठरे धरण येथे बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्याचे पंजे व नख्या गायब होत्या.
- तडवळे (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराचा मुलगा सुफियान शमसुद्दीन शेख याचा मृत्यू झाला होता तसेच दुसऱ्या हल्ल्यात गणेश कंबोलकर हे जखमी झाले होते. काळुंद्रे (ता. शिराळा) येथील संभाजी उबाळे यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
- मे २०२० मध्ये वाकुर्डे बुद्रुक येथे बिबट्याच्या बछड्याचा वाहन अपघातात मृत्यू झाला. काळामवाडी येथे अपघातात बिबट्यांचा मृत्यू झाला होता.
१७६ पाळीव प्राण्यांचा मृत्यू
शित्तुर येथील शेतकरी पांडुरंग कदम यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. शिराळा तालुक्यातील मणदूर येथील अंतु पाटील, ज्ञानदेव लाखन, विठ्ठल कुले, बनाबाई कदम, नामदेव मिरुखे, सर्जेराव पाटील, अशोक विष्णू सोनार हे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले होते. १७६ पाळीव प्राण्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.