Sangli Politics: संजयकाका यांच्या भाजपमधील घरवापसीला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:25 IST2025-04-22T20:25:12+5:302025-04-22T20:25:46+5:30

पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब : पदाधिकारी निवडीत काका गटाला डावलले

Former MP Sanjaykaka Patil entry into BJP party put on hold | Sangli Politics: संजयकाका यांच्या भाजपमधील घरवापसीला ब्रेक

संग्रहित छाया

दत्ता पाटील

तासगाव : विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार संजयकाकांना पुन्हा भाजपात परतीचे वेध लागले होते. त्यासाठी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, सोमवारी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजयकाका राष्ट्रवादीत आहेत. त्यांचे पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करायचे आहे, असे स्पष्ट केले. तत्पूर्वी रविवारी झालेल्या भाजपच्या पदाधिकारी निवडीत काकासमर्थक पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे संजयकाका यांच्या भाजपात परतीच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे.

संजयकाका पाटील यांना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर पराभव पत्करावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राजकीय अपरिहार्यता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत देखील संजयकाका यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिल्यानंतर संजयकाका यांनी पुन्हा भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

दरम्यानच्या काळात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली होती.
मात्र, संजयकाका यांचे भाजपाऐवजी सध्या असलेल्या राष्ट्रवादीतच पुनर्वसन करायला हवे, अशी भूमिका पालकमंत्री पाटील यांनीच घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जातेय. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेने संजयकाका यांच्या भाजप प्रवेशाला खो बसला आहे. संजयकाकांसोबतच इस्लामपुरातून तत्कालीन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीतच सक्रिय राजकारण करणार असल्याची भूमिका घेत जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर संजयकाका यांचा सक्रिय राजकारणातील सहभाग दुर्मीळ झाला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजयकाका यांनी त्यांचा मुलगा व भाजपचे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सभासद नोंदणी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. प्रभाकर पाटील यांनी सभासद नोंदणीसाठी सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, रविवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. यात काकासमर्थक कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. त्यामुळेच माजी खासदार संजयकाका यांच्या भाजप घरवापसीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पालकमंत्री काय म्हणाले ?

माजी खासदार संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे संजयकाका पाटील यांचे पुनर्वसन अजित पवारांनी करायचे आहे. संजयकाका पाटील आमचे जुने मित्र असल्याने त्यांच्या पुनर्वसनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदत करणार असल्याचे भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना स्पष्ट केले.

संजयकाका यांच्या भूमिकेकडे लक्ष..

संजयकाका पाटील खळबळजनक राजकीय भूमिका घेण्यात माहीर आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर संजयकाका राजकीय प्लॅटफॉर्मवर फारसे सक्रिय दिसले नाहीत. मात्र, भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे संजयकाका यांच्या परतीचे दोर कापल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय वाटचाल काय असणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Former MP Sanjaykaka Patil entry into BJP party put on hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.