Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:21 IST2025-10-31T19:20:30+5:302025-10-31T19:21:38+5:30
भाजपला खिंडीत गाठण्याची खेळी

Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार
दत्ता पाटील
तासगाव : माजी खासदार संजय पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या माध्यमातून रान उठवून भाजपवर डाव टाकला आहे. तर माजी खासदारांच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीचा पट मांडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका रंगतदार होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत भाजपपासून फारकत घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. मात्र याही निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर संजय पाटील राजकीय विजनवासात गेले. सलग दोन निवडणुकांत झालेल्या पराभवात विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांनी दिलेल्या धोक्याची सल माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांना पोहोचत राहिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादीपासून फारकत घेत ‘एकला चलो रे’चा नारा दिला.
तसेच ‘विकास आघाडी’च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. अर्थात, ही घोषणा करत असतानाच या निवडणुकीत कोणाशी हातमिळवणी करणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले. दरम्यान, निवडणुकीची भूमिका जाहीर केल्यानंतर तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर शुक्रवारी कर्जमाफीच्या मागणीसाठी सांगलीत लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एकंदरीत संजय पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेत असणाऱ्या भाजपवर डाव टाकून आगामी निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी रचना आखली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, संजयकाकांनी भाजपमधून फारकत घेतल्यानंतर त्यांना भाजपमध्ये पुन्हा एन्ट्री नसल्याचे सूतोवाच यापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर मागील काही महिन्यांत कोट्यवधींची विकासकामे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात मंजूर करून भाजपच्या नव्या शिलेदारांना रसद देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. यानिमित्ताने संजय पाटील यांना शह देऊन भाजपची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. किंबहुना शुक्रवारी तासगाव येथे पालकमंत्र्यांच्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. यानिमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा नारळ फुटणार असल्याने या मतदारसंघातील निवडणुका रंगतदार आणि नाट्यमय होतील, असे दिसून येत आहे.
भाजपला खिंडीत गाठण्याची खेळी
कोंडीत अडकलेल्या माजी खासदारांकडून भाजपला खिंडीत गाठण्याची खेळी माजी खासदार संजय काका पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेत्यांशी संपर्क ठेवला होता. त्यामुळे संजय काका पुन्हा भाजपमध्ये येतील अशी चर्चा होती. कार्यकर्त्यांनाही तीच अपेक्षा होती.
मात्र भाजपकडून संजयकाकांच्या प्रवेशाला ‘रेड सिग्नल’ दाखविला. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र सांगली जिल्ह्यात माजी खासदारांना ‘रेड सिग्नल’ दाखवण्यात आला. त्यामागे सांगली जिल्ह्यातीलच काही भाजप नेत्यांचा हात असल्याची चर्चा आहे. म्हणूनच राजकीय कोंडीत अडकलेल्या संजयकाकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ‘विकास आघाडी’च्या माध्यमातून भाजपला खिंडीत गाठण्याची खेळी खेळली आहे. यात यश येणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.