Maratha Reservation: आंदोलकांसाठी जेवण नेणाऱ्या गाड्या रोखल्या, माजी आमदार विक्रम सावंत यांचा मुंबईत पोलिसांशी वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:43 IST2025-09-02T12:42:48+5:302025-09-02T12:43:29+5:30
यानंतर पोलिसांनी मुंबईतील अटल सेतूवर गाड्या सोडून दिल्या

Maratha Reservation: आंदोलकांसाठी जेवण नेणाऱ्या गाड्या रोखल्या, माजी आमदार विक्रम सावंत यांचा मुंबईत पोलिसांशी वाद
जत : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना जेवण घेऊन निघालेल्या गाड्या मुंबईतपोलिसांनी रोखल्या. याबाबत माजी आमदार विक्रम सावंत यांनी पोलिसांना जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला. विक्रम सावंत व मुंबई पोलिसांत जोरदार वाद झाला. यानंतर पोलिसांनी मुंबईतील अटल सेतूवर गाड्या सोडून दिल्या. यावर मराठा आंदोलक शांत राहून आझाद मैदानावर दाखल झाले.
यावेळी विक्रम सावंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला. आंदोलनासाठी जत शहरातील अनेक मराठा समाजातील बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर येणाऱ्या मराठा बांधवांची उपासमार होत असल्याने विक्रम सावंत हे त्यांच्या सहकार्यासह मराठा बांधवांना जेवण घेऊन निघाले होते. यावेळी त्यांच्या गाड्या अटल सेतूवर अडवल्या. यावेळी सावंत यांनी पोलिसांना गाड्या का अडवताय, असा जाब विचारला.
वाळेखिंडीत कंटेनरमधून खाद्य पदार्थ रवाना
मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास मनोज जरांगे पाटील बसले आहेत. या उपोषणाला महाराष्ट्रातून सर्वच सकल मराठा समाजातून भक्कम पाठिंबा मिळत आहे. आझाद मैदानावर उपोषणासाठी पाठिंबा दिलेल्या समाजातील नागरिकांना पाठबळ देण्यासाठी जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील दानशुरांनी सोमवारी विविध खाद्य पदार्थ मुंबईला पाठवले. यामध्ये सुमारे ५ हजार भाकरी, केळी, बिस्कीट, पाणी बाटल्या आदी खाद्य पदार्थ कंटेनरमधून पाठवले आहेत.