Sangli: अवैध वाळूची माहिती दिल्यामुळे पांढरेवाडीत पोलिस पाटलास मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
By अशोक डोंबाळे | Updated: December 19, 2023 14:02 IST2023-12-19T13:59:30+5:302023-12-19T14:02:15+5:30
वाळू तस्करांवर कारवाईची मागणी

Sangli: अवैध वाळूची माहिती दिल्यामुळे पांढरेवाडीत पोलिस पाटलास मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
सांगली : पांढरेवाडी (ता. जत) येथील पोलिस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे (वय ४६) यांना अवैध वाळू वाहतुकीची माहिती प्रशासनाला दिली म्हणून चौघांनी काठीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
संशयित आरोपी श्रीमंत कामा करपे, मल्हारी जयाप्पा करपे, जयाप्पा कामा करपे, महादेव बाबू तांबे (सर्व रा. पांढरेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पाटील शिंदे हे दरीबडची व संख गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ थांबून अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीची माहिती संख अपर तहसीलदार यांना मोबाईलवरून देत होते.
यावेळी श्रीमंत कामा करपे, मल्हारी जयाप्पा करपे, जयाप्पा कामा करपे, महादेव बाबू तांबे यांनी संगनमत करून त्यांचे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून फिर्यादीजवळ येऊन अवैद्य वाळू उपसा वाळू वाहतुकीची माहिती अपर तहसीलदार यांना देऊ नको, असे म्हणून फिर्यादीस धमकी दिली. त्यानंतर वादावादी झाल्यानंतर काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. लाथाबुक्क्याने मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी केली. तहसीलदार व पोलिस ठाण्याच्या परवानगीने पोलिस पाटील यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वाळू तस्करांवर कारवाईची मागणी
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी होत आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस पाटील यांना मारहाण होत आहे. या घटनेचा पोलिस पाटील संघटनेकडून निषेध व्यक्त केला आहे. तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल आणि पोलिसांनी एकत्रित कारवाई करण्याची गरज आहे, अशीही पोलिस पाटील संघटनेची मागणी आहे.