सव्वाकोटीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला जप्त अन्न, औषध प्रशासनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 22:12 IST2026-01-13T22:10:55+5:302026-01-13T22:12:43+5:30
प्रतिबंधित मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

सव्वाकोटीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला जप्त अन्न, औषध प्रशासनाची कारवाई
सांगली : जिल्ह्यात तीन दिवसांत केलेल्या धडक कारवायांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने एक कोटी २३ लाख, ८५ हजार ६४० रुपयांची सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त केला आहे. प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी शासकीय दिली.
अन्न व औषध प्रशासन व विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनात राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात स्वतंत्र विशेष भरारी पथकाची स्थापन केले आहे. या पथकाचे प्रमुख भंडारा जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) यदुराज दहातोंडे यांनी पथकातील इतर अन्नसुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व मंगेश लवटे यांच्यासह सांगली जिल्ह्यामध्ये दि. ९ ते १२ जानेवारी या कालावधीत कारवाया केल्या. मगरमच्छ कॉलनी येथे वाहन एमएच १० सीआर ६४६० या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त केला. याची किंमत २४ लाख ९० हजार ४४० रुपये आहे. सहा लाखांचे वाहन असा एकूण ३० लाख ९० हजार ४४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पानमसाला व वाहन, इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरज-म्हैसाळ रोड येथे वाहन केए १३ सी ८०७४ या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला ७६ लाख ९५ हजार २०० रुपयांच्या साठ्यासह ९२ लाख ९५ हजार २०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पानमसाला व वाहन, इत्यादी साठा सील केला आहे व सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन दिवसांत केलेल्या धडक कारवायामध्ये एक कोटी, २३ लाख, ८५ हजार ,६४० रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन, सांगली येथील अन्नसुरक्षा अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, तुषार घुमरे, प्रणव जिनगर यांनी सहभाग घेतला.