सांगलीत जीबीएस रुग्णाचा पहिला बळी, महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:56 IST2025-02-22T15:56:23+5:302025-02-22T15:56:47+5:30

महापालिका आरोग्य विभाग खडबडून जागा झाला

First death of GBS patient in Sangli | सांगलीत जीबीएस रुग्णाचा पहिला बळी, महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क

सांगलीत जीबीएस रुग्णाचा पहिला बळी, महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क

सांगली : संपूर्ण देशात खळबळ उडवलेल्या जीबीएस (गुईलेन बॅरी सिंड्रोम)च्या रुग्णाचा महापालिका क्षेत्रात मृत्यू झाला आहे. हा जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे. मृत तरुण खणभागातील आहे. ३६ वर्षीय तरुणास त्रास होऊ लागल्यानंतर मागील आठवड्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

देशात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असताना पुणे शहरातही याचे रुग्ण आढळत आहेत. मिरजेत काही दिवसांपूर्वी उपचारासाठी आलेल्या परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. सांगलीतदेखील जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहेत. दि. २८ जानेवारीला चिंतामणीनगर येथे जीबीएसचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर विश्रामबाग, संजयनगर परिसरातही जीबीएसचे रुग्ण आढळून आले.

दि. १४ रोजी खणभाग येथील ३६ वर्षीय तरुणाच्या हाता-पायाचे स्नायू कमकुवत होऊन त्याला अशक्तपणा जाणवू लागला. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि. १९ रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला. महापालिका क्षेत्र व जिल्ह्यातील हा पहिलाच बळी आहे.

सांगलीतील तरुणाच्या मृत्यूनंतर महापालिका आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. तसेच खासगी रुग्णालयांनीदेखील जीबीएस रुग्ण आढळल्यास शासकीय यंत्रणेला कळविण्याचे आवाहन मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी केले आहे.

Web Title: First death of GBS patient in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.