अखेर सुधारीत ‘म्हैसाळ’च्या कामाला मिळाला मुहूर्त

By अशोक डोंबाळे | Updated: October 10, 2023 18:38 IST2023-10-10T18:38:08+5:302023-10-10T18:38:23+5:30

६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार

Finally the time has come for the reformed Mhaisal | अखेर सुधारीत ‘म्हैसाळ’च्या कामाला मिळाला मुहूर्त

अखेर सुधारीत ‘म्हैसाळ’च्या कामाला मिळाला मुहूर्त

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांसाठी एक हजार ९२८ कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कामाच्या पहिल्या टप्प्याची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांचे काम मिळविण्यात कोल्हापूरची लक्ष्मी इन्फ्रा ही कंपनी यशस्वी झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधीत ठेकेदाराने आरग ता. मिरज आणि लोणारवाडी ता. कवठेमहांकाळ येथे कामाचा शुभारंभ करुन कामाला सुरुवात केली आहे.

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र, पूर्व भागातील ६५ गावे पाण्यापासून वंचित होती. त्यांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेमधून ‘जत उपसा सिंचन योजना’ नावाने प्रकल्प मंजूर केला आहे. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी शासनाने १ हजार ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

टप्पा क्रमांक एक, दोन आणि तीन येथे पंपगृह, ऊर्ध्वगामी नलिका, टप्पा क्रमांक एक व दोनमधील जोड कालवे, बोगदा आदींच्या कामाची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. या मोठ्या कामाची निविदा मिळविण्यात लक्ष्मी इन्फ्रा ही कंपनी यशस्वी झाली आहे. या कंपनीला जलसंपदा विभागाने काम सुरू करण्याचे आदेशही होते. त्यानुसार संबंधीत कंपनीने चार दिवसापूर्वी उदघाटनाचा कोणताही सोपस्कार न करता थेट म्हैसाळ योजनेच्या कामाला सुरुवात केली आहे. आरग आणि लोणारवाडी अशा दोन टप्प्यामध्ये कामाला सुरुवात झाली आहे.

Web Title: Finally the time has come for the reformed Mhaisal