Sangli: अनिकेत कोथळे खून खटल्यात अंतिम युक्तिवाद, सुनावणी शेवटच्या टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:37 IST2025-11-08T19:36:40+5:302025-11-08T19:37:00+5:30
१८ रोजी उज्ज्वल निकम स्वत: हजर राहणार

Sangli: अनिकेत कोथळे खून खटल्यात अंतिम युक्तिवाद, सुनावणी शेवटच्या टप्प्यात
सांगली : आठ वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरून सोडलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष सरकारी वकील, खासदार उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अंतिम युक्तिवादास प्रारंभ केला. पुढील सुनावणीसाठी १८ नोव्हेंबर तारीख दिली आहे. यादिवशी ॲड. निकम हे स्वत: हजर राहणार आहेत.
सांगली शहर पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात संशयित म्हणून अनिकेत कोथळे याला अटक केली. मारहाण करून त्याचा खून केल्यानंतर मृतदेह घाटात नेऊन जाळला होता. याबाबत बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीआयडीने याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
शुक्रवारी विशेष सरकारी वकील निकम हे ‘व्हीसी’च्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर होते. त्यांनी प्राथमिक स्वरूपात अंतिम युक्तिवादास प्रारंभ केला. सरकार पक्षाने या खटल्यात ३१ साक्षीदारांची पडताळणी केली आहे. त्यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी असे साक्षीदार आहेत. तसेच सरकार पक्षाकडे अतिरिक्त कबुली जबाब देखील आहेत, अशी माहिती ॲड. निकम यांनी न्यायालयाला दिली दिली.
खटल्यातील सविस्तर व्युक्तिवाद हा प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी करून करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील तारीख मिळण्याची विनंती ॲड. निकम यांनी केली. त्यानुसार पुढील सुनावणीसाठी १८ नोव्हेंबर तारीख देण्यात आली. १८ रोजी ॲड. निकम स्वत: हजर राहणार आहेत.
शुक्रवारी सुनावणीवेळी मुख्य तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, ‘सीआयडी’चे प्रमोद नलावडे, मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे न्यायालयात उपस्थित होते.