म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप अखेर सुरू

By Admin | Updated: August 26, 2015 00:26 IST2015-08-26T00:26:44+5:302015-08-26T00:26:44+5:30

शेतकऱ्यांना दिलासा : मिरज, कवठेमहांकाळ, जतला फायदा

The fifteen pumps of the Mhasal scheme are going on | म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप अखेर सुरू

म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप अखेर सुरू

मिरज : म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप मंगळवारी सुरू करण्यात आले. खा. संजय पाटील यांनी कळ दाबून पंप सुरू केले. अवर्षणामुळे पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असताना म्हैसाळचे पाणी सोडण्यात आल्याने मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.आॅगस्टअखेरपर्यंत पाऊस न पडल्याने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. टंचाई निधीतून वीजबिलाची तरतूद करून पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. खा. संजय पाटील यांनी मंगळवारी म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले. ताकारी व टेंभू योजना चांगल्या पद्धतीने सुरूआहे. त्याच पद्धतीने म्हैसाळ योजना चालविण्याची जबाबदारी या परिसरातील साखर कारखाने व मोठ्या शेतकऱ्यांनी घ्यावी, असे पाटील यांनी सांगितले.
म्हैसाळ योजनेचा द्राक्षबागायतदारांना मोठा फायदा झाला आहे. मात्र तरीही वीजबिलाएवढी रक्कम जमा होत नाही. जिल्ह्यातील इतर दोन योजना सुरू असताना म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावे लागतात. म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले नाही, तर ही योजना बंद पडेल, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.
मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, दीपक शिंदे, पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, बाळासाहेब होनमोरे, गंगाधर तोडकर, कुमार नाईक, मिरजेचे प्रांत हेमंत निकम, म्हैसाळचे उपअभियंता सूर्यकांत नलवडे उपस्थित होते. म्हैसाळचे पहिल्या टप्प्यातील १५ पंप सुरू करण्यात आले असून, दोन महिने जतपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यातील आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे लाभक्षेत्रातील गावात पिण्यासाठी व शेतीसाठी म्हैसाळच्या पाण्याचा फायदा मिळणार आहे.
उद्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचणार असून, तीन दिवसांत म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात पोहोचणार आहे. कॅनॉलसाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)


वीस कोटींची पाणीपट्टी थकित
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनीही म्हैसाळ योजना सुरू ठेवण्यासाठी थकित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले. गेल्या आवर्तनाची थकित पाणीपट्टी १५ सप्टेंबरपर्यंत भरावी अन्यथा थकित पाणीपट्टीचा बोजा सातबारावर नोंद करण्यासाठी महसूल विभाग, जलसंपदा विभागाला सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. म्हैसाळ पाणी योजनेचे अधीक्षक अभियंता एस. के. धुमाळ यांनी सुमारे २० कोटी थकित पाणीपट्टी असून, त्यापैकी १० कोटी रुपये वीजबिल असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The fifteen pumps of the Mhasal scheme are going on