स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:55 IST2022-02-24T16:54:45+5:302022-02-24T16:55:34+5:30
सर्व कुटुंबीय झाेपलेले असताना, आरोपीने स्वत:च्या मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला

स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास
सांगली : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना तासगाव तालुक्यात घडली होती. शिक्षा झालेला आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
खटल्याची अधिक माहिती अशी की, आरोपी कुटुंबीयांसह तासगाव तालुक्यातील एका गावात राहण्यास होता. २३ एप्रिल २०१९ रोजी सर्व कुटुंबीय झाेपलेले असताना, आरोपीने स्वत:च्या मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावर त्याच्या पत्नीने प्रतिकार केला असता, त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली.
त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडितेच्या आईने तासगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दिली. तासगावचे सहायक पोलीस निरीक्षक यू. एम. दंडिले यांनी या प्रकरणाचा तपास करून त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हातरोटे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. उपलब्ध साक्षी-पुराव्याआधारे नराधम बापास आजन्म कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. मरेपर्यंत जन्मठेपेशिवाय २५ हजार रुपये दंडही करण्यात आला.
येथील विशेष पोक्सो न्यायालयात न्यायमूर्ती हातरोटे यांच्यासमोर या खटल्याची जलदगतीने सुनावणी होत महिन्याच्या आत निकाल झाला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फेही पीडित मुलीस विशेष नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.