Sangli: तिसंगीतील शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली; पुन्हा आलात, तर हातात दगडे असतील, शेतकऱ्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:02 IST2025-11-04T19:01:55+5:302025-11-04T19:02:12+5:30
'महामार्गासाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही'

Sangli: तिसंगीतील शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली; पुन्हा आलात, तर हातात दगडे असतील, शेतकऱ्यांचा इशारा
कवठेमहांकाळ : तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सोमवारी पुन्हा एकदा बाधित शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागला. “या महामार्गासाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. पुन्हा मोजणीला आलात, तर शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील,” असा इशारा देत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाकलून लावले.
गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखालील नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत आहे. या चळवळीचे नेतृत्व भाई दिगंबर कांबळे करीत आहेत. शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-सहा वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवून परत पाठविले आहे. आज पुन्हा आलेल्या पथकाला शेतात प्रवेश नाकारण्यात आला. “रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात आहे, मग समांतर नवीन महामार्गाची काय गरज? हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त करून शासन कोणाचा विकास करणार आहे?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
यावेळी दिगंबर कांबळे, वामन कदम, शिवाजी शिंदे, जगदीश पोळ, नागेश कोरे, सौरभ कदम, रत्नाकर वठारे, सुरेश कुंभार, दादा कुंभार, शिवाजी भोसले, संग्राम शिंदे, सागर शिंदे, प्रवीण कोळी, संपत कोळी, बाळू कोळी, शिवाजी कोळी, बाजीराव जाधव, बाळू कदम, दिलीप डुबुले, उल्हास पाटील, शंकर सुतार, किशोर खराडे, अविनाश खराडे, नागेश शिंदे, मनोज जाधव, सुशीला जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी दर्शविला वावरात पाय ठेवण्यास विरोध
पूर्वी झालेल्या पंचनाम्यात तहसीलदारांनी बाधीत शेतकऱ्यांची नकारात्मक भूमिका नोंदविली होती आणि “आम्ही पुन्हा मोजणीसाठी येणार नाही,” असे सांगितले होते. मात्र, वारंवार मोजणीसाठी येऊन प्रशासन शेतकऱ्यांना छळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजच्या घटनेवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. तरीदेखील तिसंगीतील सर्व शेतकरी एकजुटीने उभे राहून अधिकाऱ्यांना वावरात पाय ठेवू दिला नाही.