सांगलीतील शेटफळे येथे 'शक्तिपीठ'च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पथकाला जावे लागले माघारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:31 IST2025-05-08T18:31:02+5:302025-05-08T18:31:30+5:30
एकरी दीड कोटींच्या भरपाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

सांगलीतील शेटफळे येथे 'शक्तिपीठ'च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पथकाला जावे लागले माघारी
आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथून जात असणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी होत असणाऱ्या मोजणीस विरोध केला. आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करावी मगच मोजणी करावी, असा पवित्रा घेतल्याने मोजणी न करताच मोजणी पथकाला माघारी जावे लागले आहे. दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसीलदार सागर ढवळे यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला आहे.
शेटफळे येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी ‘महामार्गाला विरोध नाही, मात्र आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करा, मगच मोजणीसाठी शेतात पाय ठेवा’, अशी आक्रमक भूमिका घेतली. शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील शेटफळेमधून जाणार आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी निशाणी केल्या होत्या. गावातील ६३ गटातील दीडशे एकर क्षेत्रातून हा महामार्ग जाणार आहे. यामध्ये २०० हून अधिक शेतकरी बाधित होणार आहेत.
शेतकऱ्यांनी तेथे बंगले बांधले आहेत. डाळिंब, द्राक्षबागा, शेततळी, विहिरी, जलवाहिन्या आहेत. पाणी आल्याने तलावातील गाळ भरून शेती विकसित केली आहे. या शेतीतून उत्पन्न सुरू झाले आहे. महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. परिणामी अनेक शेतकरी कायमचे विस्थापित होण्याची भीती आहे.
शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्न
मोजणीस विरोध केल्यानंतर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भरपाईवर चर्चा न होता. अधिकारी कायद्याची भीती दाखवतात. विरोध कराल तर भरपाई कमी देऊ. न्यायालयात गेल्यास आणखी कमी भरपाई देऊ, अशी भीती घातली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले आहेत. ‘आधी भरपाई जाहीर करा, मग पुढील प्रक्रिया राबवा. भीती दाखवणे थांबवा, अन्यथा महामार्गालाच विरोध करू,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर घेतली.
शेतकऱ्यांचा विरोध 'शक्तिपीठ'ला नाही. आधी भरपाई एकरी दीड कोटी जाहीर करावी. मात्र तसे न करता अधिकारी भीती दाखवत आहेत. - शशिकांत मोरे, बाधित शेतकरी
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना भरपाई कोणत्याप्रकारे व कशी मिळणार आहे, याची माहिती दिली आहे. त्यांचा महामार्गास विरोध नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - डॉ. विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी विटा.