द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा; नैसर्गिक संकटावर मात करून सांगली जिल्ह्यातून १८४ टन द्राक्षांची निर्यात

By अशोक डोंबाळे | Published: January 1, 2024 04:54 PM2024-01-01T16:54:06+5:302024-01-01T16:54:34+5:30

'या' देशात निर्यात सुरू: युरोपला नव्या वर्षात

Export of 184 tonnes of grapes from Sangli district after overcoming natural calamity | द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा; नैसर्गिक संकटावर मात करून सांगली जिल्ह्यातून १८४ टन द्राक्षांची निर्यात

द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा; नैसर्गिक संकटावर मात करून सांगली जिल्ह्यातून १८४ टन द्राक्षांची निर्यात

अशोक डोंबाळे

सांगली : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबिया या देशामध्ये १८ कंटेनरमधून १८४ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. 

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या सांगलीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे. युरोपला ५ जानेवारीपासून द्राक्षांची निर्यातीला गती मिळण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षांची निर्यात वाढतच आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०२३-२४ या वर्षात १६ हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी आतापर्यंत पाच हजार ५७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी झाली आहे. यापैकी खानापूर, तासगाव तालुक्यातून द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यातून १८४ टन द्राक्ष घेऊन १८ कंटेनर दुबई, सौदी अरेबियाला रवाना झाले आहेत. नव्या वर्षात हे द्राक्ष दुबई, सौदी अरेबियाला पोच होतील, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या देशात होते निर्यात

पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू होणार आहे. सांगलीची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, सौदी अरेबिया, जर्मनी, मलेशिया, बांगलादेश आदी देशांत पाठविण्यात येतात.

जिल्ह्यातील तासगाव, खानापूर तालुक्यातून १८ कंटेनरमधून १८४ टन द्राक्षांची दुबई, सौदी अरेबियाला निर्यात झाली आहे. ५ जानेवारीपासून युरोपला द्राक्ष निर्यात सुरू होणार आहे. जानेवारीमध्ये द्राक्ष निर्यातीला गती मिळणार आहे. - पी. एस. नागरगोजे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग, सांगली.

जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी
तालुका - प्रत्यक्ष नोंदणी

मिरज - ९२४
तासगाव - १३६६
खानापूर - ९७२
पलूस - ९८
कडेगाव - ५
आटपाडी - ७२
जत - १२९६
क.महांकाळ - ८४८

Web Title: Export of 184 tonnes of grapes from Sangli district after overcoming natural calamity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली