Sangli Politics: खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:35 IST2025-09-12T20:33:04+5:302025-09-12T20:35:28+5:30
'जयश्रीताई पाटील यांचा प्रवेश जबरदस्तीने करायला त्या लहान मूल नाहीत'

Sangli Politics: खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले..
सांगली : वसंतदादा घराणे फोडल्याचा आरोप चुकीचा आहे. दादांच्या नातसून व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भविष्याचा व कार्यकर्त्यांचा विचार करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश जबरदस्तीने करायला त्या लहान मूल नाहीत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक वाढत असली तरी सध्या ते भाजपला हवेत अशी स्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमती पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार विशाल पाटील यांनी दादा घराणे फोडल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देत पालकमंत्री पाटील म्हणाले की, जयश्री पाटील या लहान मूल नाहीत. त्यांना भाजपमध्ये जबरदस्ती आणले नाही. भवितव्याचा व कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही प्रक्रिया अनेक दिवस सुरू होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार विशाल पाटील यांची भाजपशी सलगी वाढल्याबद्दल विचारता पालकमंत्री पाटील म्हणाले, उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली आहे. त्यामुळे ते आता भाजपचे सहयोगी सदस्य होतील, अशी कोणतीही गोष्ट भविष्यात नाही. भाजपला हे खासदार हवेतच, असा प्रसंगदेखील भविष्यात येणार नाही. महापालिकेच्या कारभाराबाबत ते म्हणाले की, आयुक्तांचे चांगले काम आहे. काहींना विस्कळीत काम करण्याची सवय लागली होती. त्यांना आयुक्तांच्या कामाचा त्रास होऊ लागला आहे; पण नागरिकांना शहराच्या विकासाची शिस्त आवडते.