कारखानदार जोमात, ऊस उत्पादक कोमात; थकीत बिलाने शेतकऱ्यांची कोंडी
By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 17:58 IST2024-12-20T17:57:23+5:302024-12-20T17:58:01+5:30
अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन ...

कारखानदार जोमात, ऊस उत्पादक कोमात; थकीत बिलाने शेतकऱ्यांची कोंडी
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन उसाचे गाळप करून २१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना उसाचे बिलच दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्याचे चित्र पाहून कारखानदार जोमात, ऊसउत्पादक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील १९ पैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. यापैकी राजारामबापू साखर कारखान्याच्या तीन शाखांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी झाला आहे. तरीही संबंधित कारखान्यांनी उसाचे पहिले बिल शेतकऱ्यांना दिले नाहीत. साखर कारखान्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, बँकांचे हप्तेही थांबले आहेत. यामुळे कारखानदारांनी त्वरित उसाची बिले द्यावीत, अशी मागणीही शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांमधून होत आहे.
कायद्याचाही धाक राहिला नाही की काय?
२००८-०९ च्या एफआरपी (रास्त व उचित दर) कायद्यानुसार तुटलेल्या उसाचे चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याची हमी आहे. जर साखर कारखानदारांनी वेळेत उसाचे बिल न दिल्यास १५ टक्के व्याज देण्याची तरतूदही आहे. या कायद्याचाही आता साखर कारखानदारांना धाक राहिला नाही की काय, असा प्रश्नही ऊसउत्पादकांनी उपस्थित केला आहे.
बिल न दिल्याबद्दल साखर आयुक्तांकडे तक्रार : संदीप राजोबा
साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू झाल्यापासून १४ दिवसांत उसाची बिले शेतकऱ्यांना दिली पाहिजेत, असा कायदा आहे. हा कायदाच साखर कारखानदार पाळत नसतील तर त्यांच्याविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार करून न्याय मागणार आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.
बिल वेळेवर न देणाऱ्या कारखान्यावर आंदोलन : सुनील फराटे
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही अनेक कारखान्यांनी उसाची बिले काढली नाहीत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे, त्या कारखान्यासमोर शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली.