म्हशीला रेडकू झाले तरी बोलवा, शिंदेसेनेच्या खासदाराचे वक्तव्य चांगलेच चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:28 IST2025-09-15T13:25:47+5:302025-09-15T13:28:07+5:30
त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांत जोरदार हशा पिकला

म्हशीला रेडकू झाले तरी बोलवा, शिंदेसेनेच्या खासदाराचे वक्तव्य चांगलेच चर्चेत
सांगली: हातकणंगले मतदारसंघाचे शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचा कामेरी (ता. वाळवा) येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारसंघ असलेल्या वाळवा तालुक्यातील गावांमध्ये खासदारांचे दर्शन होत नसल्याची टीका गत लोकसभा निवडणुकीत झाली होती. निवडणुकीवेळी याबाबत त्यांनी हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र, कामेरीत त्यांनी हाच धागा पकडत लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.
‘मी कामेरीतील कार्यक्रमास येणार, हे दिल्लीत असतानाच सांगितले होते. खासदार म्हणून मी येत राहीन. म्हशीला रेडकू झाले तरी खासदारांना बोलवा, पण खासदार दिसत नाहीत, असे कृपा करुन म्हणू नका’ त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांत जोरदार हशा पिकला. राजकीय नेत्याला कसे राहावे लागते, याविषयीसुद्धा त्यांनी टिपणी केली.
‘जनतेची कामे करताना, बऱ्याचदा उणिवांचा शोध घेऊन काम करावे लागते. कधी कटू सत्यही बोलावं लागतं. नेतृत्व केवळ गोड बोलणारं असून चालत नाही, कटू सत्य बोलून समाजाला पुढे नेतो तेच नेतृत्व खरे असते. त्यामुळे कोणीही याबाबतीत गैरसमज करुन घेऊ नये. ’ त्यांच्या या वाक्यावरील व्हिडिओ समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झाला असून, लोक त्यावर व्यक्त होत आहेत.