सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गततिमानतेवर भर- कामगार मंत्री सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2022 12:15 PM2022-08-15T12:15:13+5:302022-08-15T12:15:21+5:30

स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगलीत ध्वजारोहण

Emphasis on the dynamism of government systems for the development of the common man- Labor Minister Suresh Khade | सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गततिमानतेवर भर- कामगार मंत्री सुरेश खाडे

सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गततिमानतेवर भर- कामगार मंत्री सुरेश खाडे

googlenewsNext

- श्रीनिवास नागे

सांगली : इतिहासातून प्रेरणा घेऊन राज्य आणि देशाला विकासाकडे आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास नेण्यासाठी शासकीय यंत्रणांनी कामाच्या गतीमानतेवर भर द्यावा. शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास शासनाविषयक सकारात्मक लोकभावना निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने चालल्यास वेगाने काम होते. येत्या काळात ही चाके गतीने फिरताना नक्कीच पहायला मिळतील, असे प्रतिपादन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या व स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले कार्य, विविध लढे याचा उहापोह करून उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते. 

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, माणसांच्या मुलभूत गरजांची पूर्तता झाली असून आता आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत आहोत. सुदृढ, चांगले आरोग्य ही महत्वाची बाब झाली आहे. यासाठीच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जिल्ह्यातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दरमहा सरासरी 3 हजार 544 गरोदर मातांना आवश्यक संदर्भसेवा निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन शआरोग्य योजनेसोबत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेंतर्गत कुटुंबातील सदस्यांना देशांतर्गत व सर्व अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये विनामुल्य आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येतो. सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 1 लाख 63 हजार पेक्षा जास्त लाभार्थींची ई-गोल्डन कार्ड काढण्यात आलेली आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी  अद्यापही ज्यांचा दुसरा डोस  प्रलंबीत आहे त्यांनी  शकोरोना  प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस व बुस्टर डोस  घ्यावा, असे आवाहनही केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झालेला असून टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यात आज आणखी 34 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक ODF प्लस झाल्याची घोषणा  त्यांनी यावेळी केली. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात आजअखेर 2 लाख 97 हजार पेक्षा जास्त कुटुंबाना वैयक्तीक नळ कनेक्शन देण्यात आले आहे. याचबरोबर 714 नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखडा तयार असून 437  योजनांची  कामे प्रगतीपथावर आहेत. विविध  सोयी  सुविधा  देवून गुणवत्तापूर्ण जीवनमान लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही सुरेश खाडे यावेळी म्हणाले.

जिल्ह्यामध्ये सध्या धरणक्षेत्रामध्ये व इतरही भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या व नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. संभाव्य पुरस्थितीच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनही पुर्णपणे सज्ज आहे. पण पुरपरिस्थिती उद्भवूच नये यासाठी मी प्रार्थना करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा या अभियानास जिल्ह्यातील लोकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी मन:पूर्वक धन्यवाद देवून अनेक भाषा, जाती, धर्मांनी, आपला देश एकसंघ बनलेला आहे. देशात सुराज्य निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बलशाली देश घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत भारताने विविध क्षेत्रात केलेली प्रगती नेत्रदीपक असल्याचे खाडे यांनी यावेळी सांगितले.

खाडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या रणसंग्रामात सांगली जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. शिराळा तालुक्यातील बिळाशीचा जंगल सत्याग्रह हा चळवळीचा टप्पा ठरला. धुळे येथे सांगलीच्या क्रांतिकारकांनी लुटलेला खजिना, वाटेगाव येथील शेतकऱ्यांनी बर्डे गुरूजींच्या नेतृत्वाखालील सारावाढी विरोधात काढलेला मोर्चा, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव कचेरीवर काढलेला मोर्चा, इस्लामपूर मामलेदार कचेरीवरील मोर्चा, विश्रामबाग येथील रेल्वे स्टेशन जाळण्याची घटना, 1943 साली कुंडल बँकेवर घातलेला दरोडा, शेणोली स्थानकानजीक रेल्वेची लुट यासारख्या विविध घटनांचे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत प्रखर महत्व आहे. जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या कारवायांमध्ये जिल्ह्यातील महिला क्रांतिकारकांनी दिलेले योगदानही मोठे आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची कामगिरी हे तर स्वातंत्र्य लढ्याचे सुवर्णपानच आहे.  

सांगली जिल्ह्याला खेळांची मोठी परंपरा असून आजअखेर 49 आंतरराष्ट्रीय खेळाडू या जिल्ह्याने दिले आहेत. असे सांगून खाडे म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत  जिल्ह्यातील  संकेत सरगर यांने वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक मिळवून सांगली जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखीत केले आहे. मिरज येथे तयार होत असलेल्या जगप्रसिध्द तंतूवाद्यातील तानपुरा या  वाद्यास जीआय  मानांकन  मिळावे  यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असून ते लवकरच मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

बदलत्या हवामानामुळे पूर आणि महापुरांची वारंवारता वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणामही मोठ्या मानवी समूहावर होत आहे, असे सांगून खाडे म्हणाले, आपत्तीतून सावरण्यासाठी केवळ तात्कालिक उपाय उपयेगाचे नाही तर दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक आहे. त्यानुसारच दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देणार आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने  एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तसेच या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी त्यांनी एकोपा टिकवूया. भारताची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्वल परंपरा अखंड ठेवूया, असे कळकळीचे आवाहन केले. यावेळी खाडे यांच्याहस्ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटल सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली, प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना उत्कृष्ट जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून निवड झालेले डॉ. कैलास पाटील, पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेले केंद्रीय गृहमंत्रीपदक प्राप्त मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोश डोके, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.

Web Title: Emphasis on the dynamism of government systems for the development of the common man- Labor Minister Suresh Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.